अमिताभ बच्चन देखील आहेत या अभिनेत्याचे फॅन, दुबईतील बुर्ज खलिफामध्ये आहे याचे अवाढव्य घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 14:54 IST2020-05-21T14:53:52+5:302020-05-21T14:54:57+5:30
या अभिनेत्याला त्याच्या अभिनयासाठी अनेकवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील अतिशय श्रीमंत अभिनेत्यांमध्ये यांची गणना केली जाते.

अमिताभ बच्चन देखील आहेत या अभिनेत्याचे फॅन, दुबईतील बुर्ज खलिफामध्ये आहे याचे अवाढव्य घर
मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचा आज वाढदिवस असून २१ मे १९६० ला केरळमधील एलनथूर मध्ये त्यांचा जन्म झाला. ते एक अभिनेते असण्यासोबतच निर्माते आणि गायक देखील आहेत. मोहनलाल यांची गणना केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांमध्ये होते. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. त्यांचे सगळे शिक्षण तिरुवंतपुरममध्ये झाले असून त्यांना लहानपणापासून अभिनयाची आावड होती. त्यामुळे ते अनेक नाटकांमध्ये भाग घेत असत.
थिरनोत्तम हा मोहनलाल यांनी त्यांच्या आयु्ष्यात साईन केलेला पहिला चित्रपट होता. पण काही कारणास्तव तो प्रदर्शित होऊ शकला नाही. त्यामुळे मंजिल विरिंजा पूक्कल या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर ग्रँड एंट्री घेतली. या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांची लोकप्रियता एकेकाळी इतकी शिगेला पोहोचली होती की, महिन्यातून दोन तरी त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत असत आणि हे चित्रपट प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेत असत.
मोहनलाल यांना आतापर्यंत नऊ वेळा राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असून त्यांना अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. मोहनलाल यांचे भारतातच नव्हे तर जगभरात अनेक फॅन आहेत. सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन देखील त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. अमिताभ यांनी अनेक मुलाखतींमध्ये याविषयी सांगितले आहे.
मोहनलाल यांच्याकडे प्रचंड पैसा असून भारतातील अनेक ठिकाणी त्यांची मालमत्ता आहे. पण त्याचसोबत दुबईतील सगळ्यात मोठ्या बुर्ज खलिफामध्ये त्यांचे २९ व्या मजल्यावर अवाढव्य घर आहे. त्यांच्याकडे विविध प्रकारच्या गाड्या असून ते अभिनयासोबतच व्यवसायात देखील सक्रिय आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती आणि डिस्ट्रीब्यूशन केले असून त्यांची अनेक हॉटेल्स आहेत. त्यांच्याकडे इतका पैसा आहे की, त्यांना दक्षिणेतील अंबानी असे देखील म्हटले जाते.