"फटाके फोडणं थांबवा, ही परंपरा नाही, सामान्य ज्ञानाचा अभाव आहे" शाहिद कपूरची पत्नी संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:41 IST2025-10-23T13:35:21+5:302025-10-23T13:41:42+5:30
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत-कपूर हिने फटाके फोडणाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय.

"फटाके फोडणं थांबवा, ही परंपरा नाही, सामान्य ज्ञानाचा अभाव आहे" शाहिद कपूरची पत्नी संतापली
Mira Kapoor Slams Bursting Firecrackers: दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा सण. सध्या सगळीकडे दिवाळीचा सण जल्लोषात साजरा केला जातोय. कुठे रांगोळीची आरास तर कुठे फटाक्यांचा धुमधडाका सुरू आहे. काही जण दिवे लावून, तर काही जण मोठ्या प्रमाणात फटाके फोडून हा सण साजरा करत आहेत. अशातच अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत-कपूर हिने फटाके फोडणाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय.
मीरानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने केवळ फटाके फोडणाऱ्यांवरच नाही, तर 'सुरसुरी' हातात घेऊन इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करणाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे. तिनं लिहलं,"आपण अजूनही फटाके का फोडत आहोत? जरी ते फक्त मुलांना एकदा पाहण्यासाठी किंवा आपण ते फक्त त्यांना अनुभवण्यासाठी एकदा फोडत असलो तरी ते योग्य नाही. फक्त इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करण्यासाठी हातात 'सुरसरी' घेणंही बरोबर नाही. कृपया या सर्व गोष्टी सर्वसामान्य आहेत, असं म्हणणं थांबवा. आपण या गोष्टींना सर्वसामान्य ठरवलं तर आपली मुलंही तेच करतील आणि या गोष्टींना अंतच नसेल".
मीराने यावेळी 'पृथ्वी दिना'च्या दिवशी पर्यावरणाबद्दल जागरूकता दाखवणाऱ्या लोकांवर निशाणा साधला. ती म्हणाली, "'पृथ्वी दिना'निमित्त तुम्ही तुमच्या मुलांकडून 'फटाक्यांना नाही म्हणा' असे पोस्टर बनवून घेता आणि पुन्हा दिवाळी आली की तीच गोष्ट विसरता. AQI ची बातमी ही काही इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकण्यासाठी नाही. याच हवेत आपली मुलं श्वास घेत आहेत. अशा परंपरेत मला सहभागी व्हायची इच्छा नाही आणि दु:खद बाब म्हणजे विशेषाधिकार, शिक्षण, जागरुकता आणि समृद्धी असूनही सामान्य ज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळे तुम्ही फटाक्यांचा आनंद घेत असताना मी माझ्या मुलांना ते पाहण्यासाठी पाठवणार नाही. कृपया आता थांबा", अशी पोस्ट मीरा कपूरनं केली आहे. मीराच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी सण साजरा करण्याच्या परंपरेचे समर्थन केले आहे.