#MeToo: विकास बहल प्रकरणी अंतिम सुनावणी होणार २१ नोव्हेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:52 IST2018-10-25T19:43:50+5:302018-10-25T19:52:47+5:30
लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या दिग्दर्शक विकास बहलच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.

#MeToo: विकास बहल प्रकरणी अंतिम सुनावणी होणार २१ नोव्हेंबरला
लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या दिग्दर्शक विकास बहलच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने विकास बहलने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे.
विकास बहलवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्याच्या विरोधात त्याचे एकेकाळचे सहकारी अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी सुद्धा विकासच्या विरोधात मत प्रकट केले होते. त्यामुळे विकास बहलने अनुराग व अन्य काहींविरोधात दहा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडीत महिलेने आज प्रतिज्ञापत्र सादर करत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. मुंबई उच्च न्यायालयात एस जे काथावाला यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे.
२०१५ मध्ये ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाच्या प्रमोशन टूरदरम्यान विकास बहलने आपली छेडछाड केली होती, असा आरोप त्याच्याच एका महिला क्रू मेंबरने केली आहे. या महिलेच्या आरोपानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणि नयनी दीक्षित यांनीही विकास बहलवर गंभीर आरोप केलेत. हे प्रकरण गाजत असताना अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी हेही विकासच्या विरोधात बोलले. विकासने असे केले होते, असे अनुराग कश्यप आणि विक्रमादित्यने मान्य केले. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांवर अनुरागने ट्विट करत विकास बहलने जे केले ते भीतीदायक आहे, असे म्हटले होते. मला त्या महिलेवर पूर्ण विश्वास आहे. तिला पाठींबा आहे, असेही अनुरागने म्हटले होते. विक्रमादित्यनेही अनुरागची री ओढत विकास बहलच्या कृत्याची निंदा केली होती.