"स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात...", अरबाजचं नाव न घेता मलायका अरोरानं साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:04 IST2025-12-04T11:02:18+5:302025-12-04T11:04:50+5:30
Malaika Arora : अलीकडेच मलायकाने घटस्फोट आणि अफेअरच्या बाबतीत महिलांना जज करण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तिने अरबाज खानचे नाव न घेता आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पुरुषांवरही भाष्य केले आहे.

"स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात...", अरबाजचं नाव न घेता मलायका अरोरानं साधला निशाणा
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोराने १९९८ साली अरबाज खानसोबत लग्न केले होते, परंतु २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर, मलायका बराच काळ अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण हे नातंदेखील जास्त काळ टिकू शकले नाही. तर अरबाज खानने शूरा खानसोबत दुसरे लग्न केले. दरम्यान अलीकडेच मलायकाने घटस्फोट आणि अफेअरच्या बाबतीत महिलांना जज करण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तिने अरबाज खानचे नाव न घेता आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या मुलीशी लग्न करणाऱ्या पुरुषांवरही भाष्य केले आहे.
मोजो स्टोरीसाठी बरखा दत्त यांच्याशी बोलताना मलायका अरोरा म्हणाली, ''स्ट्राँग असल्यामुळे तुम्हाला सतत जज केले जाते. ही मते तर आपल्याला मिळणारच आहेत. माझ्या मनात पुरुषांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे, कारण माझ्या आयुष्यातील काही पुरुष खूप महत्त्वाचे आणि उत्कृष्ट राहिले आहेत.''
''स्वतःच्या अर्ध्या वयाच्या मुलीशी लग्न करतात...''
मलायका अरोरा पुढे म्हणाली, ''आज जर एखाद्या पुरुषाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला, घटस्फोट घेतला, स्वतःच्या अर्ध्या वयाच्या एखाद्या मुलीशी लग्न केले, तर असे वाटते की, वाह, काय पुरूष आहे! पण जेव्हा एखादी स्त्री असे करते, तेव्हा तिला प्रश्न विचारले जातात की, ती असे का करत आहे? तिला समजत नाहीये का? असे रूढिवादी विचार सतत पसरत राहतात.''
मलायकाला आईने दिला हा सल्ला
मलायका म्हणाली की, जेव्हा तिने वयाच्या २५ व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या आईला आश्चर्य वाटले होते. तिने सांगितले, ''माझी आई नेहमी म्हणायची, बाहेर जा, तुझ्या आयुष्याचा आनंद घे आणि कृपया पहिल्याच मुलाशी लग्न करू नकोस, ज्याच्यासोबत तू डेटवर गेली आहेस आणि मी तसेच केले. मी त्या पहिल्या मुलाशी लग्न केले, ज्याच्यासोबत मी डेट केले होते. मी असे का केले हे तिला समजत नव्हते.'' अभिनेत्रीने पुढे सांगितले, ''आई म्हणायची की, जर तू असे केलेस, तर तुला जगात काय आहे हे कधी कळणार? आणि मी म्हणायची की, आई आता शांत हो. पण ती नेहमीच आम्हाला जगण्यासाठी आणि स्वप्ने पाहण्यासाठी प्रोत्साहित करत राहिली आहे. तिने आम्हाला कधीही काहीही करण्यापासून थांबवले नाही.''