बाबो! ऑरीला खांद्यावर घेऊन मराठी बायकांनी घातली फुगडी, व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:04 IST2025-11-07T13:03:56+5:302025-11-07T13:04:44+5:30
ऑरीचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बाबो! ऑरीला खांद्यावर घेऊन मराठी बायकांनी घातली फुगडी, व्हिडीओ तुफान व्हायरल
बॉलिवूड सेलिब्रिटींचा लाडका आणि सोशल मीडिया सेन्सेशन असलेला ऑरी कायमच चर्चेत असतो. कधी फोटोसाठी दिलेल्या पोझमुळे तर कधी मोबाईल कव्हरमुळे ऑरी चर्चेचा विषय बनतो. अनेक इव्हेंट आणि पार्टीमध्येही ऑरी हजेरी लावत असतो. अनेक सेलिब्रिटीही ऑरीसोबत फोटो काढण्यासाठी पोझ देताना दिसतात. आता ऑरीचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ऑरीच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ऑरीने नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत काही नऊवारी नेसलेल्या मराठमोळ्या महिला दिसत आहे. यावरुन हा मंगळागौरचा कार्यक्रम असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या कार्यक्रमात ऑरीदेखील उपस्थित होता. पुढे व्हिडीओत पाहायला मिळतंय की दोन महिला ऑरीला खांद्यावर घेऊन फुगडी घालत आहेत.
हा व्हिडीओ पाहून ऑरीचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. "मला पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं", असं म्हणत ऑरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. जान्हवी कपूरनेही ऑरीच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ऑरीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.