सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत 'धडक २'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 21:22 IST2024-05-28T21:21:19+5:302024-05-28T21:22:13+5:30
Dhadak 2 Movie : बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'धडक २' सिनेमा यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत 'धडक २'मध्ये झळकणार ही मराठमोळी अभिनेत्री
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यातील पात्रांचे रसिकांच्या मनातील स्थान कायम आहे. या मालिकेतील निशा आठवतेय का? निशाची भूमिका अभिनेत्री मंजिरी पुपालाने साकारली आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान मंजिरी पुपाला लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.
मंजिरी पुपाला हिने इंस्टाग्रामवर धडक २चे मोशन पोस्टर शेअर करत ती या सिनेमात झळकणार असल्याचे सांगितले आहे. तिने हे पोस्टर शेअर करत लिहिले की, धर्मा मुव्हिजसोबत माझा पहिला चित्रपट. मी धर्मा मुव्हिजचे चित्रपट थिएटरमध्ये पाहत मोठे झाले आहे. धडक २मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी भेटीला येणार आहे.
मंजिरी पुपालाच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. मंजिरीने दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर ग्रहण या मालिकेत ती झळकली. याशिवाय ती मराठी चित्रपट पार्टीमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील ‘इश्कबाझ - प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत तिने एसीपी आदिती देशमुखची भूमिका साकारताना दिसली होती. तसेच मंजिरी नेटफ्लिक्सवरील बेताल या वेबसीरिजमध्ये एका आदिवासी महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
'धडक' हा चित्रपट मराठीतील सुपरहिट 'सैराट'चा हिंदी रिमेक होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. आता सैराट २ येण्या आधीच 'धडक २'ची घोषणा झाली आहे.