'तुंबाड २' मध्ये दिसणार 'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री, पहिला प्रोमो आला समोर; कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:37 IST2026-04-08T12:36:00+5:302026-04-08T12:37:19+5:30
'तुंबाड २' मध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्णी लागल्याची चर्चा आहे. या सिनेमाचा पहिला छोटासा प्रोमो काल आऊट झाला.

'तुंबाड २' मध्ये दिसणार 'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री, पहिला प्रोमो आला समोर; कोण आहे ती?
'तुंबाड २' सिनेमाची सध्या चांगली उत्सुकता आहे. काहीच दिवसांपूर्वी 'तुंबाड'चे निर्माते सोहम शाह यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली. तेव्हापासून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली. इतकंच नव्हे दोन दिवसांपूर्वी सोहम शाह यांनी फोटो पोस्ट करुन 'तुंबाड २'च्या सेटवरील फोटोही पोस्ट केले. त्या फोटोंवरुन शूटिंगला सुरुवात झाली, असं सांगण्यात आलं. आता 'तुंबाड २' मध्ये एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्णी लागल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री म्हणजे अनिता दाते-केळकर.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनिता दाते आता 'तुंबाड २' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा पहिला छोटासा प्रोमो काल आऊट झाला. या प्रोमोत देवीची मूर्ती दिसते आणि मागे रहस्यमयी संगीत वाजतं. हा प्रोमो अनिता दातेने शेअर केला आहे. त्यामुळे ती 'तुंबाड २' मध्ये दिसणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. अनिता 'तुंबाड'च्या पहिल्या भागातही दिसली होती. त्यामुळे दुसऱ्या भागातही अनिता विनायकच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल. अनिता पुन्हा 'तुंबाड २'मध्ये झळकणार असल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
'तुंबाड २' बद्दल सांगायचं झालं तर, तब्बल ८ वर्षांनी 'तुंबाड'चा सीक्वल येणार आहे. पहिल्या भागातलं अनोखं कथानक, हस्तरची दहशत, विनायकची लालसा हे सर्व पाहायला मिळालं. आता दुसऱ्या भागात कथानक कसं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आदेश प्रसाद सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सोहम शाह 'तुंबाड २'चा निर्माता आहे. अजून 'तुंबाड २'च्या रिलीज डेटवरील पडदा उठला नाही.