50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह- दिलीप कुमार यांचा किस्सा...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:54 PM2022-07-20T15:54:05+5:302022-07-20T15:54:50+5:30

Naseeruddin Shah Birthday: आज नसीरूद्दीन शाह यांचा वाढदिवस. त्यानिमित्त किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे...  

marathi actor kiran mane post on naseeruddin shah birthday | 50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह- दिलीप कुमार यांचा किस्सा...!!

50 वर्ष उलटून गेली या गोष्टीला... ! किरण मानेंनी सांगितला नसीरूद्दीन शाह- दिलीप कुमार यांचा किस्सा...!!

googlenewsNext

Naseeruddin Shah Birthday:  बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. सिनेमाचा किडा चावला आणि जेमतेम 16 वर्षांच्या वयात नसीरूद्दीन शाह मुंबईत पळून आले. तिकडे घरच्यांची शोधाशोध सुरू झाली. दोन महिने झाले तरी मुलाचा पत्ता नाही म्हटल्यावर वडिलांनी सगळीकडे शोध चालवला. तोपर्यंत त्यांचा पोरगा एका बंगल्यात मुक्कामाला पोहोचला होता. हा बंगला होता दिग्गज दिलीप कुमार (Dilip kumar) यांचा. काय होती ही स्टोरी, कामाच्या शोधात असलेले नसीरूद्दीन शाह थेट दिलीप कुमार यांच्या बंगल्यात कसे पोहोचले? मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ही स्टोरी सांगितली आहे. आज नसीरूद्दीन शाह यांचा वाढदिवस. त्यानिमित्त किरण माने यांनी त्यांच्या आयुष्यातला हा किस्सा सांगणारी पोस्ट शेअर केली आहे.  

किरण मानेंची पोस्ट...

पन्नास वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला !

अजमेरचं एक वांड पोरगं. पिच्चरचं लै याड. घरातनं पळून मुंबईला आलं. 'हिरो' बनायला. आईबाप टेन्शनमधी. लै शोधला. पत्ताच लागंना. बापाकडं अजमेरच्या दर्ग्याचं व्यवस्थापन होतं. अभिनेते दिलीपकुमार यांच्या बहिनी सकीना आपा आनि सईदा या दोघींचं अजमेरला सारखं येनजानं असायचं. त्यामुळं ह्या फॅमिलीची वळख होती. पोरगं नक्की मुंबैला गेलं म्हनून त्यांनी फोन करून त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. सईदानं मुंबैचं पोलीस खातं कामाला लावून त्या पोराला शोधून काढलं. पोरानंबी तंवर फिल्मलाईनमध्ये लै धक्के खाल्ले होते. सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला होता...

सईदानं त्याला गाडीत बसवलं आन् थेट पाली हिलच्या दिलीपकुमारजींच्या बंगल्यावर घिवून आली...सकीना आपानं झाप झाप झापला. पोरानंबी रडारड केली, माफी मागीतली... गेस्ट रूममधी त्याची तात्पुरती रहान्याची सोय करन्यात आली. सकिनाआपाचा मानूस असल्यामुळं बंगल्यात मोकळेपनानं वावरायला परवानगी होती. नोकरचाकर अडवत नव्हते.

...पोरगं भिरीभिरी नजरंनं दिलीपकुमारला शोधायला लागलं. पन अजून दिलीपकुमार दिसला नव्हता. शुटिंगसाठी बाहेरगांवी होता. हाॅलमधी सहा-सात 'फिल्मफेअर'च्या ट्राॅफीज बघून पोरगं परत 'येडं' झालं ! घरात कुनी नसताना ट्राॅफी हातात घेऊन ॲवाॅर्ड मिळाल्याचं नाटक करायला लागलं. त्यानं ठरवलं, 'एक ना एक दिवस आपन हे मिळवायचं'. मग एका हातात 'फिल्मफेअर' घिवून दुसर्‍या हातानं हवेत हात हलवून प्रेक्षकांचं अभिवादन करत, खोटंखोटं ह्रदयस्पर्शी भाषन करून झालं !

...एक दिवस पोरगं सकाळी उठलं. सहज खिडकीतनं बाहेर बघितलं तर थेट दिलीपकुमार दिसला ! आग्ग्गाय्य्यायाया... साक्षात खुदाच दिसल्यागत झालं. दिलीपकुमार बागेत एकटे फिरत होते. आता यांना गाठून थेट पायच धरायचे. 'कायबी करा पन मला सिनेमात काम मिळवून द्या. मी परत अजमेरला जानार नाय, हितंच र्‍हानार तुमच्याकडं.' म्हनायचं. पोरगं दबकत-दबकत त्यांच्याजवळ गेलं.. दिलीपकुमारसायबांनी त्याला बघितलं, आन् त्यानं तोंड उघडेपर्यन्त साहेबांनीच 'लेक्चर' झाडलं ! लै चिडलेवते. "सिनेमात काम करणं सोपं नाही. लहान मुलांनी आधी शिक्षण पूर्ण करावं. असली भलती स्वप्नं बघू नयेत. हे मायाजाल आहे." वगैरे वगैरे लै बोलले... पोरगं काय बोलायच्या आत 'विषय संपला' असा हात केला आनि 'चल जा हितनं.रूममधी बस.' असंबी खुनावलं.

दुसर्‍या दिवशी डेहराडून एक्सप्रेसमधून त्याला घरी, अजमेरला पाठवन्यात आलं...

या घटनेनंतर पंध्रा-वीस वर्षांनी ह्योच पोरगा 'एन.एस.डी.' , 'एफ.टी.आय.आय.' वगैरेमधी अभिनयाचं रितसर शिक्षन घेऊन, सगळ्या तयारीनिशी मुंबईत आला.. आज त्यो 'महान अभिनेता' म्हनून वळखला जातो.. त्याचं नांव - 'नसीरूद्दीन शाह' !  ...योगायोग म्हणजे नंतर नसीरभाईंना दिलीपजींबरोबर काम करायची संधीबी मिळाली... 'कर्मा' पिच्चरमधी ! पन ल्हानपनच्या 'त्या' भेटीबद्दल बोलायचं धाडस मात्र नाय झालं नसीरभाईंचे... 'त्यांच्यातरी कशाला लक्षात र्‍हातंय ते', असं म्हनून नसिरभाईंनी सगळं मनातच ठेवलं. नंतरच्या काळात, आजपर्यन्त छोट्या गावांमधनं मुंबईला यिवून अभिनयक्षेत्रात कायतरी भारी करून दाखवन्याची स्वप्नं बघनार्‍या... सामान्य चेहर्‍याच्या मनोज बाजपेयी, इरफान,नवाज,अतुल कुलकर्नी,संजय मिश्रा याच्यासह लै लै लै 'स्माॅल टाऊन बाॅईज'साठी कायम 'प्रेरणा' ठरनार्‍या नसिरभाईंचा आज वाढदिवस...

नसिरभाई, कडकडीत सलाम आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! लब्यू. ❤️

- किरण माने.

Web Title: marathi actor kiran mane post on naseeruddin shah birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.