मनोज वाजपेयीला 'देवदास' सिनेमाची मिळाली होती ऑफर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:55 IST2025-04-05T17:54:59+5:302025-04-05T17:55:45+5:30
Manoj Bajpayee : संजय लीला भन्साळी यांनी 'देवदास' सिनेमासाठी मनोज वाजपेयीलाही अप्रोच केले होते, मात्र त्याने या एका कारणासाठी या सिनेमाचा भाग होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

मनोज वाजपेयीला 'देवदास' सिनेमाची मिळाली होती ऑफर, पण...
२००२ मध्ये प्रदर्शित झालेला संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा 'देवदास' (Devdas Movie) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक आहे. ९०च्या दशकातली मुलं असोत की आजची पिढी, हा चित्रपट जेव्हा जेव्हा टेलिव्हिजनवर लागतो तेव्हा लोक मोठ्या आवडीने पाहतात. या चित्रपटाच्या सेट डिझाईनपासून ते 'देवदास'ची गाणी आणि संवाद आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात शाहरुख खान(Shah Rukh Khan)ने 'देवदास'ची भूमिका साकारली होती, तर ऐश्वर्या राय(Aishwarya Rai)ने पारोची आणि माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)ने 'चंद्रमुखी' ही आयकॉनिक भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सत्या' नंतर संजय लीला भन्साळी यांनी 'देवदास' सिनेमासाठी मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee)लाही अप्रोच केले होते, मात्र त्याने या एका कारणासाठी या सिनेमाचा भाग होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
मनोज वाजपेयी बॉलिवूडमधीस उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. चांगले चित्रपट करण्यासोबतच त्याने ओटीटीवरही आपली छाप उमटविली आहे. न्यूज १८च्या रिपोर्टनुसार, मनोज वाजपेयीने एका मुलाखतीत देवदासची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. या वृत्तात असंही सांगण्यात आले होते की, जेव्हा मनोज वाजपेयीला संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, तेव्हा त्याने चित्रपटात मुख्य भूमिका साकारायची होती, सहायक व्यक्तिरेखा नाही म्हणून त्याचा भाग होण्यास नकार दिला होता. एवढ्या मोठ्या चित्रपटात सहायक भूमिका आपल्या प्रतिमेसाठी योग्य नाही, असे मनोज वाजपेयीचे मत होते.
मनोज वाजपेयींच्या नकारानंतर या अभिनेत्याची लागली वर्णी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज वाजपेयीने पात्र नाकारल्यानंतर जॅकी श्रॉफला त्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. संजय लीला भन्साळींच्या देवदासमध्ये जॅकी श्रॉफने चुन्नीलालची भूमिका साकारली होती. ही भूमिका जॅकी श्रॉफने उत्तम बजावली. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.