"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 09:19 IST2025-09-10T09:19:14+5:302025-09-10T09:19:46+5:30
मनोज वाजपेयीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाऊचं भरभरुन कौतुक केलं आहे. भाऊकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं मनोज वाजपेयीने म्हटलं आहे.

"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
'चला हवा येऊ द्या'मधून विनोदाचे फटकारे मारत घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे भाऊ कदम. अतिशय मेहनत करुन अभिनयाचं टॅलेंट दाखवत भाऊने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. भाऊचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून तो एक हरहुन्नरी अभिनेता आहे. 'इन्स्पेक्टर झेंडे' या हिंदी सिनेमातून भाऊ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात त्याने बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. मनोज वाजपेयीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाऊचं भरभरुन कौतुक केलं आहे. भाऊकडून खूप काही शिकायला मिळाल्याचं मनोज वाजपेयीने म्हटलं आहे.
"भाऊ कदमला मी 'चला हवा येऊ द्या'मध्ये पाहिलं होतं. या सिनेमामुळे मला भाऊ कदमकडून खूप काही शिकायला मिळालं. शूटिंगमधझ्ये ते नेहमी आमच्यासोबत असायचे. असं वाटतं की ते काही बोलत नाहीत गप्प असतात. त्यामुळे त्यांची तयारी दिसत नाही. पण ते एक असे अभिनेता आहेत ते जितका वेळ शूटिंगमध्ये असतात. त्यांच्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतं. एकाच डायलॉगचे खूप व्हर्जन ते तयार करून बघतात. ते इतके शांत आहेत की आजूबाजूच्या कोणालाच कळत नाही. सगळ्यांना असं वाटतं की ते आले आणि डायलॉग बोलले. पण, ते खूप विचार करत असतात. ते त्यांच्या कामाकडे खूप गंभीररित्या पाहतात. ते उभे राहिले आणि लोक हसायले लागले असं होत नाही. भाऊ कदम खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे", असं मनोज वायपेयी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
इन्स्पेक्टर झेंडे हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे. सिनेमात मनोज वाजपेयीने इन्स्पेक्टर झेंडे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे. भाऊ कदम, हरीश दुधाडे, ओंकार राऊत हे मराठी कलाकार मनोज वाजपेयीसोबत स्क्रीन शेअर करत आहेत. मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला (Charles Sobhraj) दोनवेळा पकडलं होतं. त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत हा चित्रपट आहे.