भयंकर अपघातामुळे महिमा चौधरीचा बिघडलेला चेहरा; स्ट्रगलबद्दल सांगताना म्हणाली- "मला चित्रपटांतून काढलं गेलं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:25 IST2025-12-15T11:24:59+5:302025-12-15T11:25:26+5:30
Mahima Chaudhary : महिमा चौधरीने नुकतंच सांगितलं आहे की एक काळ असा होता जेव्हा तिला चित्रपटांतून बाहेर काढण्यात आलं होतं. अभिनेत्रीने खुलासा केला की एका अपघातामुळे ती वर्षभर घरी बसून होती.

भयंकर अपघातामुळे महिमा चौधरीचा बिघडलेला चेहरा; स्ट्रगलबद्दल सांगताना म्हणाली- "मला चित्रपटांतून काढलं गेलं"
९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणींचा सामना केला आहे. अभिनेत्रीने एका वेदनादायक अपघातापासून ते कर्करोगापर्यंत अनेक संकटे झेलली आहेत. सध्या महिमा तिच्या आगामी 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी, अभिनेत्रीने तिचा संघर्ष आणि अडचणींनी भरलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सिद्धार्थ काननला दिलेल्या एका लेटेस्ट मुलाखतीत महिमा चौधरी म्हणाली की, ''खूप काही घडलं. माझ्या पहिल्या चित्रपटानंतर, मला कोर्टात खेचलं गेलं, मला अनेक चित्रपटांतून काढून टाकलं गेलं, कारण असं म्हटलं गेलं होतं की माझा मुक्तासोबत करार आहे, जे खरं नव्हतं. माझा अपघात झाला, मग मी वर्षभर घरी बसून राहिली. मी छोट्या भूमिका करायला सुरुवात केली, ते सर्व चित्रपट हिट झाले. अगदी जेव्हा मी फक्त एक गाणं करत होती, तेव्हाही.''
कार अपघातामुळे बिघडलं चेहऱ्याचं रूप
महिमा चौधरी पुढे म्हणते की, ''मग लोक मला फक्त एक गाणं ऑफर करू लागले, मी त्यांना नकार दिला. मला लकी मॅस्कॉट म्हटलं जायचं, पण मला याहून खूप काही करायचं होतं. मग मी पुनरागमन केलं. प्रियदर्शन, राज संतोषी, लज्जा इत्यादींसोबत चित्रपट केले.' या दरम्यान महिमा चौधरीने 'दिल क्या करे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या त्या भयंकर कार अपघाताविषयी देखील सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की, 'काचेचे ६७ छोटे-छोटे तुकडे होते, जे मायक्रोस्कोपखाली खरडून काढले गेले. दुसऱ्या दिवशी, चेहरा आणखी सुजलेला आणि विद्रूप झाला होता.''
''मी उन्हात बाहेर जाऊ शकत नव्हते...''
महिमा सांगते, ''माझे मित्र माझ्या जखमेवर हसत होते, त्यांना वाटलं की माझं कोणाशी तरी भांडण झालं आहे आणि मी खोटं बोलत आहे. त्यावेळी, मला माहीत नव्हतं की मी आयुष्यात काय करणार, हे खूप कठीण होतं. मी उन्हात बाहेर जाऊ शकत नव्हते, टाके ठीक होण्याची वाट पाहावी लागत होती, मग ते भरून येत होते, म्हणून चेहऱ्याला ओलसर ठेवावं लागत होतं. ऊन आणि यूव्ही किरणांमुळे डाग पडू शकतात. मी मध्ये १-२ गाणी पूर्ण केली, पण कोणालाही बाहेर जाऊन काम करण्याची पूर्ण सूट देऊ शकत नव्हते. माझ्या कॉस्च्युम डिझायनरला डागांवर, विशेषतः डाव्या बाजूला जी जास्त सुजली होती, हिऱ्याच्या आकाराचे ठिपके लावावे लागले. त्यानंतर, हे एक फॅशन बनलं, लोक ते विकायलाही लागले.''