माधुरी दीक्षित म्हणते, आलिया माझ्या बायोपिकसाठी परफेक्ट, पण...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:51 IST2019-04-05T15:50:23+5:302019-04-05T15:51:07+5:30
आलियाचा अभिनय पाहून ‘धकधक गर्ल’ माधुरीही कमालीची प्रभावित झालीय. इतकी की, पुढेमागे तिचे बायोपिक बनलेच तर त्यात आलियानेच तिची व्यक्तिरेखा साकारावी, अशी माधुरीची इच्छा आहे. अर्थात सोबत एक अटही आहे.

माधुरी दीक्षित म्हणते, आलिया माझ्या बायोपिकसाठी परफेक्ट, पण...!!
‘कलंक’ या आगामी चित्रपटात माधुरी दीक्षित व आलिया भटची जुगलबंदी रंगणार आहे. ही जुगलबंदी प्रेक्षकांना किती भावते, ते लवकरच कळेल. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना कळलीय. होय, आलियाचा अभिनय पाहून ‘धकधक गर्ल’ माधुरीही कमालीची प्रभावित झालीय. इतकी की, पुढेमागे तिचे बायोपिक बनलेच तर त्यात आलियानेच तिची व्यक्तिरेखा साकारावी, अशी माधुरीची इच्छा आहे. अर्थात सोबत एक अटही आहे.
होय,‘कलंक’ या चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये माधुरी आलियाबद्दल भरभरून बोलली. तुझ्या बायोपिकमध्ये तुझी व्यक्तिरेखा आलियाने साकारलेली तुला आवडेल का? असा प्रश्न माधुरीला यावेळी विचारण्यात आला. यावर माधुरीने नक्कीच, असे उत्तर दिले. पण हे उत्तर देताना तिने एका गोष्टीवर विशेष भर दिला. माझे बायोपिक आलेच तर त्यात आलियाला माझ्या भूमिकेत बघणे, मला नक्कीच आवडेल. आलिया एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. गली बॉय, हाय वे, राजी या चित्रपटातील तिच्या अभिनयाने मला कमालीचे प्रभावित केले आहे. माझ्या बायोपिकसाठी आलिया अगदी परफेक्ट आहे. पण हो, माझ्या बायोपिकसाठी तिला आणखी थोडे कथ्थक शिकावे लागेल. ती चांगली नृत्य करते. पण माझ्या बायोपिकसाठी तिला नृत्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे माधुरी हसत हसत म्हणाली.
माधुरीच्या उत्तरावर सगळे हसू लागली. यावेळी आलियाही हजर होती. ती सुद्धा माधुरीचे हे उत्तर ऐकून हसली. पण या सगळ्यांत आलियाला माधुरीने अप्रत्यक्षपणे एक मोठा सल्ला दिला. तो म्हणजे,अभिनयासोबत नृत्यावर अधिक भर देण्याचा. आता हा सल्ला आलिया किती मनावर घेते, ते बघूच.