Birthday Special : का कोर्टापर्यंत पोहोचली दिलीप कुमार व मधुबालाची ‘लव्हस्टोरी’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 08:00 IST2020-02-14T08:00:00+5:302020-02-14T08:00:01+5:30
आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. 1933 साली आजच्याच दिवशी मधुबालाचा जन्म झाला होता.

Birthday Special : का कोर्टापर्यंत पोहोचली दिलीप कुमार व मधुबालाची ‘लव्हस्टोरी’?
सौंदर्याचे दुसरे नाव म्हणजे, मधुबाला. एकेकाळी या मधुबालाने आपल्या अभिजात सौंदर्याने चाहत्यांना वेड लावले होते.सौंदर्याची खाण असलेल्या मधुबालाची आज जयंती. आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. 1933 साली आजच्याच दिवशी मधुबालाचा जन्म झाला होता.
१४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीत मधुबालाचा जन्म झाला. तिचे खरे नाव, मुमताज जहां बेगम असे होते. ११ बहिणींत मधुबालाचा पाचवा क्रमांक होता. मधुबालाचे वडिल अताउल्लाह पेशावर येथील तबांखूच्या कारखान्यात काम करायचे. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि तेथून मुंबईला.
मधुबालाने वयाच्या नवव्या वर्षी चित्रपटात काम केले. १९४२ साली आलेल्या ‘बसंत’ या चित्रपटात मधुबालाने बालकलाकाराची भूमिका केली होती. १९४७ मध्ये ‘नीलकमल’ या सिनेमात ती अभिनेत्री म्हणून झळकली. तिच्या सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ पाडली. पण दुर्दैवाने उण्यापु-या वयाच्या 36 व्या वर्षी मधुबालाने जगाला अलविदा म्हटले.
व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी जन्मलेली मधुबाला अतिशय रोमॅन्टिक स्वभावाची होती. पण वडिलांमुळे आणि एका चित्रपटामुळे तिचे आयुष्यच बदलले.
होय, 1951 साली ‘तराना’च्या सेटवर मधुबाला व दिलीप कुमार यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिलीप कुमार यांना गुलाबाचे फुल आणि एक प्रेमपत्र पाठवत मधुबालाने आपले प्रेम व्यक्त केले होते. दोघांची प्रेमकहाणी बहरत असताना मधुबालाचे वडिल अयातुल्ला खान यांना त्याची भणक लागली आणि त्यांनी या नात्याला विरोध केला. असे म्हणतात की, मधुबाला आणि दिलीपकुमार यांचे लग्न झाले तर आपला आर्थिक स्रोत संपेल, या भीतीने मधुबालाच्या वडिलांनी विरोध केला होता. अशाही स्थितीत या मधुबाला व दिलीप कुमार यांचे प्रेम कित्येक वर्षे फुलले. पण ‘नया दौर’ या सिनेमाचे निमित्त झाले आणि ही प्रेमकहाणी कोर्टापर्यंत पोहोचली.
बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ मध्ये मधुबाला व दिलीप कुमार लीड रोलमध्ये होते. भोपाळमध्ये 40 दिवस शूटिंग ठरले होते. पण मधुबालाला आऊट डोअर शूटींगसाठी पाठवण्यास तिचे वडील मानेनात. मधुबालाही वडिलांच्या आग्रहाबाहेर नव्हत्या. अखेर नाईलाजास्तव बी. आर. चोप्रा यांनी मधुबालाऐवजी वैजयंतीमालाला चित्रपटासाठी साईन केले. मधुबालाला काढून वैजयंतीमालाला साईन करण्याचे हे प्रकरण इतके विकोपाला गेले की, अखेर कोर्टात पोहोचले. या वादासोबत अप्रत्यक्षपणे मधुबाला व दिलीप कुमार यांचे प्रेमप्रकरणही न्यायालयात गेले. न्यायालयात दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाची बाजू घेत, मधुबालांविरोधात साक्ष दिली. झाले... दिलीप कुमार यांच्या या साक्षीने मधुबाला प्रचंड दुखावल्या गेल्या.
मतभेद इतके वाढले की, मधुबाला व दिलीप कुमार यांच्यात कधीही न मिटणारे अंतर आले. खरे तर यावेळी आधीपासूनच सुरु असलेले ‘मुगल -ए-आजम’चे शूटींग सुरु होते. पण सेटवर सोबत असूनही मधुबाला व दिलीप कुमार अनोळखी होते. एक लव्हस्टोरी कायमची संपली होती...