वयाच्या ९०व्या वर्षी लता मंगेशकर यांचं इंस्टाग्रामवर पदार्पण, चाहते म्हणाले - 'वेलकम ताई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 18:35 IST2019-09-30T18:35:16+5:302019-09-30T18:35:39+5:30
लता मंगेशकर यांनी वयाच्या ९०व्या वर्षी ट्विटरव्यतिरिक्त इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.

वयाच्या ९०व्या वर्षी लता मंगेशकर यांचं इंस्टाग्रामवर पदार्पण, चाहते म्हणाले - 'वेलकम ताई'
भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. ट्विटरवरील त्यांचे ट्विट्स काही सेकंदात लोकांच्या चर्चेचा विषय बनून जातो. आता लता मंगेशकर यांनी वयाच्या ९०व्या वर्षी ट्विटरव्यतिरिक्त इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे.
लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबरला त्यांचा ९०वा वाढदिवस साजरा केला. ट्विटरवर सक्रीय राहणाऱ्या लता मंगेशकर यांनी वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर इंस्टाग्रामवर आपलं अधिकृत अकाउंट सुरू केलं. यासोबतच त्यांनी दोन फोटोदेखील शेअर केले. पहिल्या फोटोत लता मंगेशकर यांच्या हातात पुस्तक दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं की, नमस्कार, आज पहिल्यांदा मी इंस्टाग्रामवर आले आहे. दोन तासात त्यांचे ४७ हजार चाहते इंस्टाग्रामवर त्यांना फॉलो करू लागले.
सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं खूप स्वागत केलं. काहींनी शुभेच्छा दिल्या तर काहींनी वेलकम ताई म्हटलं.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांनी त्यांची बहिण मीना मंगेशकर खाडीकर यांचं हिंदी पुस्तक 'दीदी और मैं' प्रकाशित केलं होतं.यावेळीचा फोटो देखील त्यांनी शेअर केला आणि लिहिलं की नमस्कार, काल माझी छोटी बहिण मीना खाडीकर यांनी माझ्यावर लिहिलेलं पुस्तक 'दीदी और मैं' मला भेट म्हणून दिले.
लता मंगेशकर यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटबद्दल त्यांची बहिण मीना मंगेशकर खाडीकर म्हणाल्या की, लता मंगेशकर स्वतः ट्विट करतात. त्या खूप सक्रीय आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की, त्यांची दीदी पूर्ण दिवस गात असतात. पण आता आधीसारख्या तानपुरा घेऊन रियाज करत नाहीत. स्वतः जेवण बनवतात व सर्वांना खाऊ घालतात.