"गेल्या वर्षभरापासून...", बहीण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात गैरहजर असल्याच्या चर्चांवर कुश सिन्हाने दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 10:33 IST2025-06-22T10:29:13+5:302025-06-22T10:33:14+5:30
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील गैरहजेरीच्या अफवांवर कुश सिन्हाने सोडलं मौन, म्हणाला- "मी तिच्या लग्नात..."

"गेल्या वर्षभरापासून...", बहीण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात गैरहजर असल्याच्या चर्चांवर कुश सिन्हाने दिलं उत्तर
Kush Sinha Talks About Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) तिच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. गेल्यावर्षी २३ जूनला सोनाक्षीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. सध्या सोनाक्षी तिच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे तिचा भाऊ कुश सिन्हा ठरलाय. त्यावेळी, सोनाक्षी सिन्हाच्या लग्नामध्ये वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांनी हजेरी लावली होती. परंतु, भाऊ लव आणि कुश लग्नात गैरहजर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर पहिल्यांदाच कुश सिन्हाने मौन सोडलं आहे.
बहीण सोनाक्षीच्या लग्नात अनुपस्थित असल्याच्या त्या चर्चांवर कुश सिन्हा पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. 'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हे वृ्त्त खोट्या असल्याचं म्हटलं आहे. त्यादरम्यान कुश म्हणाला, "मी सोनाक्षीच्या लग्नात अनुपस्थित असल्याच्या चर्चा गेल्या वर्षापासून सुरू आहेत. मला माहित नाही की मी तिच्या लग्नात नव्हतो या अफवा का आणि कोणी पसरवल्या."
त्यानंतर पुढे कुशने म्हटलं. "सोनाक्षी माझी बहीण आहे. मी तिच्या लग्नात का नसेन? तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की ही सगळी माहिती चुकीची आहे. ती खूप छान आहे आणि एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. शिवाय मी तिच्यासोबत माझ्या चित्रपटात काम करत आहे." असं म्हणत कुशने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, कुश सिन्हा सध्या 'निकिता रॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. 'निकिता रॉय' चित्रपटात सोनाक्षी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर परेश रावल, अर्जुन रामपाल यांसारखे कलाकारांची देखील भूमिका आहे. येत्या २७ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.