लोकप्रिय गायकानं EX पत्नीला कोर्टात खेचलं, ठोकला ३० लाखांचा मानहानी खटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:06 IST2025-12-18T10:02:43+5:302025-12-18T10:06:50+5:30
लोकप्रिय गायकाचं वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे.

लोकप्रिय गायकानं EX पत्नीला कोर्टात खेचलं, ठोकला ३० लाखांचा मानहानी खटला
Kumar Sanu : बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायदेशीर वादात सापडले आहेत. कुमार सानू यांनी त्यांची माजी पत्नी रीता भट्टाचार्य यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. रीता यांनी एका मुलाखतीमध्ये कुमार सानू यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले होते. या खोट्या आरोपांमुळे आपली प्रतिमा डागाळली असल्याचा दावा गायकाने केला आहे.
कुमार सानू यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये ३० लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. तसेच, सोशल मीडिया आणि विविध प्लॅटफॉर्मवर असलेल्या रीता भट्टाचार्य यांच्या बदनामीकारक मुलाखती तातडीने हटवण्यात याव्यात, अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी १७ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
काय आहेत रीता भट्टाचार्य यांचे आरोप?
सप्टेंबर २०२५ मध्ये रीता भट्टाचार्य यांच्या काही मुलाखती व्हायरल झाल्या होत्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी दावा केला होता की, गरोदरपणाच्या काळात कुमार सानू यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यांना अनेकदा उपाशी ठेवले गेले आणि स्वयंपाकघरात बंद करून ठेवले. इतकेच नाही तर, त्यांना दूध किंवा आवश्यक वैद्यकीय सेवा देखील नाकारण्यात आली. कुमार सानू यांचे अनेक अफेअर्स होते आणि त्यांनी कुटुंबाची कधीच काळजी घेतली नाही.
घटस्फोटाच्या अटींचे उल्लंघन?
कुमार सानू यांची बाजू मांडणाऱ्या प्रसिद्ध वकील सना रईस खान यांनी असा युक्तिवाद केला आहे की, हे आरोप म्हणजे २००१ मधील घटस्फोटाच्या कराराचे उल्लंघन आहे. ९ फेब्रुवारी २००१ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात झालेल्या संमती दस्तऐवजात दोन्ही पक्षांनी भविष्यात एकमेकांवर कोणतेही आरोप न करण्याची अट मान्य केली होती. या अटीचे उल्लंघन करून रीता यांनी सानू यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचे याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, कुमार सानू आणि रीता भट्टाचार्य यांचा २००१ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांना जान कुमार सानू हा मुलगा आहे, जो 'बिग बॉस १४' मुळे चर्चेत आला होता.