'कुछ कुछ होता है' आणि DDLJ चा सिक्वेल येणार का? काजोलनं अगदी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:58 IST2025-06-12T17:55:19+5:302025-06-12T17:58:03+5:30

'कुछ कुछ होता है' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमांच्या सिक्वेलवर काजोलनं भाष्य केलंय.

Kuch Kuch Hota Hai 2 And Dilwale Dulhania Le Jayenge 2 In The Works? Kajol Reveals Truth | 'कुछ कुछ होता है' आणि DDLJ चा सिक्वेल येणार का? काजोलनं अगदी स्पष्टच सांगितलं

'कुछ कुछ होता है' आणि DDLJ चा सिक्वेल येणार का? काजोलनं अगदी स्पष्टच सांगितलं

'गदर' 'सिंघम', 'स्त्री' आणि दृश्यम अशा काही हीट ठरलेल्या सिनेमांचे सिक्वेल आले आणि तेही ब्लॉकबस्टर ठरले. सिक्वेल सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर खणखणीत कामगिरी करत असल्यानं बहुतांश सिनेनिर्माते, दिग्दर्शकांना त्यांच्या सिनेमाचा सिक्वेल करण्याचा मोह आवरत नाही. काही प्रसंगी पसंतीस उतरलेल्या एखाद्या क्लासिक सिनेमाचा सिक्वेल व्हावा, अशी मागणी सिनेरसिकांचीदेखील असते. जसं की, 'कुछ कुछ होता है' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. सुपरहिट ठरलेल्या या दोन्ही चित्रपटांचा सिक्वेलवर आता काजोलनं भाष्य केलंय. 

काजोलनं नुकतंच पिंकव्हिलाशी संवाद साधला. यावेळी तिनं 'कुछ कुछ होता है' आणि DDLJच्या सिक्वेलबाबत म्हणाली,  "लोक म्हणतात, 'कुछ कुछ होता है २' बनवा. पुन्हा एकदा शाहरुखसोबत प्रेमात पडताना पाहायला मिळावं अशी लोकांची अपेक्षा आहे. पण त्या चित्रपटांनी यश मिळवलं ,कारण तो काळ वेगळा होता. आजच्या काळात लोकांच्या नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलून गेलाय. आता जर एखादं नातं टिकत नसेल, तर लोक म्हणतात की समोर दहा पर्याय आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला त्या जुन्या शैलीतील प्रेमकथा किती आवडतील, याबद्दल मला जरा शंका आहे".

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'च्या सिक्वेलची कल्पनाही आवडत नसल्याचं काजोलनं स्पष्ट केलं. ती म्हणाली, "DDLJ 2 ही कल्पनाही आवडत नाही. ट्रेनच्या त्या प्रसिद्ध सीननंतर काय झालं, हे जाणून घ्यायची कोणालाच उत्सुकता नसावी. त्यामुळे जेव्हा 'द एंड' आलं, तेव्हा प्रेक्षकांनी पुढचं स्वतःच्या कल्पनांनी ठरवावं हेच जास्त सुंदर", असं तिनं म्हटलं. 

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'माँ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.  अजय देवगणने या सिनेमाची निर्मिती केली आहे. काजोलसोबत सिनेमात रोनित रॉय आणि इंद्रनील गुप्ता हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्ताने पहिल्यांदाच हॉरर सिनेमात काजोलला पाहण्यात तिचे चाहते उत्सुक आहेत.
 

Web Title: Kuch Kuch Hota Hai 2 And Dilwale Dulhania Le Jayenge 2 In The Works? Kajol Reveals Truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.