मुहूर्त ठरला ! 'क्रिकेट अँकर' गौरव कपूर अन् अभिनेत्री कृतिका कामरा 'या' तारखेला करणार लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:19 IST2026-02-08T15:16:15+5:302026-02-08T15:19:45+5:30
Kritika Kamra & Gaurav Kapur Marriage: गौरव कपूरचे हे दुसरे लग्न आहे

मुहूर्त ठरला ! 'क्रिकेट अँकर' गौरव कपूर अन् अभिनेत्री कृतिका कामरा 'या' तारखेला करणार लग्न
Kritika Kamra & Gaurav Kapur Marriage: बॉलीवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा आणि क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध चेहरा अँकर गौरव कपूर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोघेही येत्या मार्च महिन्यात लग्न करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे. यामध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहणार आहेत. लग्न झाल्यानंतर मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील मित्रांसाठी मुंबईत एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
गौरव कपूरचे दुसरे लग्न
कृतिका आणि गौरव यांनी डिसेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावर एक 'ब्रेकफास्ट डेट'चा फोटो शेअर करून आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी २०२६चे स्वागतही जैसलमेरमध्ये एकत्र केले होते. गौरव कपूरचे हे दुसरे लग्न असणार आहे. यापूर्वी त्याचे लग्न अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलसोबत झाले होते. परंतु २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे, कृतिका कामराचे नाव यापूर्वी करण कुंद्रा आणि जॅकी भगनानी यांच्याशी जोडले गेले होते. पण तिचे हे पहिलेच लग्न आहे.
लग्नाच्या तयारीला वेग
कृतिका कामरा 'कितनी मोहब्बत है' या मालिकेतून घराघरात पोहोचली असून अलीकडे तिने 'बंबई मेरी जान' आणि 'तांडव' सारख्या वेब सीरिजमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गौरव कपूर हा त्याच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या युट्यूब शोसाठी आणि आयपीएल होस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. आता या दोघांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून चाहते आता या जोडीला लग्नाच्या बेडीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.