"माझी कधी इच्छा झाली नाही,कारण...", 'बिग बी' अन् शाहरुखसोबत काम करण्याबद्दल प्रसिद्ध निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 17:25 IST2026-02-19T17:23:43+5:302026-02-19T17:25:46+5:30
"त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा...; अमिताभ बच्चन अन् शाहरुखबद्दल प्रसिद्ध निर्मात्याने केलेलं वक्तव्य चर्चेत

"माझी कधी इच्छा झाली नाही,कारण...", 'बिग बी' अन् शाहरुखसोबत काम करण्याबद्दल प्रसिद्ध निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला...
Sudip Sharma : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीत अग्रगण्य असणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान. या दोन्ही कलाकरांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरुखचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. त्यांची केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. इंडस्ट्रीतील प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. अशातच एका निर्मात्याने बिग बी अन् शाहरुखबद्दल काम करण्याच्या मुद्द्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'पाताल लोक' आणि 'कोहरा सीझन-२' यांसारख्या गाजलेल्या सीरिजचे लेखक,निर्माते सुदीप शर्मा यांनी नुकतीच डिजिटल कमेंटरीला मुलाखत दिली. यादरम्यान, त्यांना अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खानसोबत भविष्यात काम करण्याचा काही विचार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.यावर उत्तर देत सुदीप शर्मा म्हणाले, "नाही, मला कधीच अशी इच्छा झाली नाही. शिवाय मी कधी असा विचारही केला नाही. मी इथे कोणत्याही विशिष्ट कलाकारासोबत काम करण्यासाठी आलो नाही."
यापुढे मुलाखतीत ते म्हणाले, "इथे मी माझी कथा सांगण्यासाठी आलो आहे, ती कहाणी जी मला नेहमीच सांगायची होती. अशा कथा ज्या मला सूचल्या होत्या आणि मला आवडल्या होत्या. केवळ बड्या सिनेस्टार्ससोबत काम करता यावं, याचं मला कधीच कुतूहल नव्हतं. खरंतर, मला अशी संधी कधी मिळाली तर दडपणच येईल. कारण, ती एक खूप मोठी जबाबदारी असेल."
मग ते म्हणाले, "एका कलाकाराची स्वत: ची एक वेगळी अभिनय शैली असते. त्यानुसार, चित्रपटाची कथा आणि त्याला साजेशी भूमिका असावी लागते. कथा उत्तम असावीच पण जो कोणी ती भूमिका साकारेल, त्याने ती अगदी प्रामाणिकपणे साकारणं हीच माझी अपेक्षा असते. त्यावर चाहते कसे प्रतिक्रिया देतील किंवा स्टारडवर त्याचा कसा परिणाम होईल? हा विचार करुन मी स्क्रिप्ट लिहित नाही. कधीकधी या गोष्टी चित्रपटापेक्षा जास्त चर्चेत येतात आणि मला त्यात अजिबात रस नाही." असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.