'केसरी २'मुळे ब्रिटिश संसदेत जालियनवाला हत्याकांडावर चर्चा, जाहीरपणे भारताची माफी मागणार?

By मयुरी वाशिंबे | Updated: March 28, 2025 15:42 IST2025-03-28T15:41:51+5:302025-03-28T15:42:10+5:30

जालियनवाला बाग हत्याकांडाचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित करण्यात आला आहे.

Kesari 2 sparks debate on Jallianwala Bagh massacre in British Parliament British MP Bob Blackman Said British Government Should Apologize To India | 'केसरी २'मुळे ब्रिटिश संसदेत जालियनवाला हत्याकांडावर चर्चा, जाहीरपणे भारताची माफी मागणार?

'केसरी २'मुळे ब्रिटिश संसदेत जालियनवाला हत्याकांडावर चर्चा, जाहीरपणे भारताची माफी मागणार?

जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh massacre) ही भारतीय इतिहासातील हिंसक घटना आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी घडलेल्या जालियनवाला हत्याकांडाला आता १०६ वर्ष पुर्ण होतील. एवढा काळ उलटला असला तरीही त्याच्या जखमा आजही भारतीयांच्या मनात आहेत. पण, आपल्या लष्करी अधिकाऱ्याच्या क्रूरतेची माफी अद्याप ब्रिटनने माफी मागितलेली नाही. यावर अनेकदा चर्चा झाली आहे. याप्रकरणी एप्रिल २०१९ मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी संसदेत माफी नाही तर केवळ खेद व्यक्त केला होता. अशातच पुन्हा एकदा जालियनवाला बाग हत्याकांडाचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित करण्यात आला आहे.

 ब्रिटनने १०६ वर्षे जुन्या या घटनेबद्दल भारतीयांची माफी मागावी असा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव अशावेळी समोर येत आहे, जेव्हा अक्षय कुमारचा  (Akshay Kumar) केसरी चॅप्टर २: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जलियानवाला बाग हा चित्रपट या काळ्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात वकील आणि राजकारणी सी. शंकरन नायर यांच्या धैर्यपूर्ण प्रवासाचे चित्रण आहे. त्यांनी ब्रिटिश राजवटीचा पर्दाफाश करण्यासाठी संघर्ष केला होता आणि या हत्याकांडामागील सत्य समोर आणले.

ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन (Bob Blackman) यांनी जालियनवाला बाग घटनेबाबत  हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भाषण दिलं. ते म्हणाले, "१३ एप्रिल १९१९ रोजी अनेक लोक कुटुंबियांसोबत शांततापूर्ण वातावरणात एकत्र आले होते. त्यावेळी ब्रिटीश सैन्यातील जनरल डायरने आपल्या सैनिकांना दारुगोळा संपेपर्यंत त्या निष्पाप लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या हत्याकांडात १५०० लोक मारली गेली आणि १२०० लोक जखमी झाले होते.  ब्रिटीश साम्राज्यावरील या डागासाठी जनरल डायरला अपमान सहन करावा लागला होता".

पुढे ते म्हणाले, "२०१९ मध्ये, त्यावेळच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मान्य केले की, हा ब्रिटिश वसाहतवादी राजवटीवरील डाग होता. मात्र, आपल्याकडून अद्याप औपचारिकरित्या माफी मागण्यात आलेली नाही. तर आता येत्या १३ एप्रिल २०२५ ला जालियनवाला बाग हत्याकांडाचा १०६ वा वर्धापन दिवस आहे. तर मग आता ब्रिटन १०६ वर्षे जुन्या या घटनेबद्दल भारतीयांची माफी मागावी, याबाबत अधिकृत निवेदन येऊ शकते का? असा प्रस्ताव त्यांनी संसदेत ठेवला.

जालियनवाला बाग हत्याकांड, ब्रिटन जाहीरपणे भारताची माफी मागणार?

८ मार्च १९१९ रोजी ब्रिटिश सरकारने रौलेट कायदा लागू केला. त्यातील तरतुदीनुसार, कोणत्याही भारतीयाला फक्त संशयावरुन व खटला दाखल न करता तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला. याविरोधात महात्मा गांधी यांनी ६ एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. देशात ठिकठिकाणी आंदोलनं, निदर्शने सुरू झाली. त्या वेळी अमृतसरचे लोकप्रिय नेते डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना पोलिसांनी अटक केली. यामुळे स्थानिक जनता संतप्त झाली.

रौलेट कायदा मागे घ्यावा आणि नेत्यांची सुटका करावी, या मागण्यांसाठी अमृतसरमधील हजारो लोक १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत एकत्र जमले. या जमावावर ब्रिगेडियर जनरल डायरच्या आदेशानुसार पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये हजारांवर लोकांना जीव गमवावा लागला, अनेकांनी जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणच्या विहिरीत उड्या घेतल्या. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. याच्या चौकशीसाठी नेमलेल्या हंटर कमिशनने या गोळीबारात केवळ ३७९ लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात अनेकजण हुतात्मा झाले होते. तेव्हापासून या हल्ल्यासाठी ब्रिटनने माफी मागावी ही मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येते आहे. 

'केसरी चॅप्टर २'बद्दल...

अक्षय कुमारचा 'केसरी चॅप्टर २' या सिनेमात अक्षय हा ब्रिटिश काळातील प्रसिद्ध भारतीय वकील सर सीएस नायर यांची भूमिकेत आहे. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निषेध म्हणून सीएस नायर यांनी शिक्षण मंत्री आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेती भारतीय प्रतिनिधी या आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी गांधी आणि अराजकता (१९२२) हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी हत्याकांडाच्या वेळी पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओ'डवायर यांच्यावर टीका केली. यावर डायरने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला. ओ’ड्वायर विरुद्ध नायर या खटल्याची सुनावणी लंडनमधील उच्च न्यायालयात झाली. ही सुनावणी पाच आठवड्यांहून अधिक काळ चालली होती. कायदेशीर इतिहासातील सर्वात प्रदीर्घ दिवाणी खटल्यांपैकी एक असलेला हा खटला डायरने जिंकला. त्यानंतर सर नायर यांच्याकडे दोन पर्याय होते, एकतर डायरची माफी मागावी किंवा भरपाई म्हणून ५०० पौंड द्यावेत. पण त्यांनी ५०० पौंड नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

 

Web Title: Kesari 2 sparks debate on Jallianwala Bagh massacre in British Parliament British MP Bob Blackman Said British Government Should Apologize To India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.