कतरिना कैफ विकी कौशलपेक्षा इतक्या वर्षांनी आहे मोठी, कोणाची आहे सर्वात जास्त नेटवर्थ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:21 IST2025-11-07T18:21:01+5:302025-11-07T18:21:33+5:30
Katrina Kaif And Vicky Kaushal : बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ७ नोव्हेंबर रोजी आपल्या चाहत्यांना सकाळी सकाळीच एक मोठी गोड बातमी दिली आहे. त्या दोघांना पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.

कतरिना कैफ विकी कौशलपेक्षा इतक्या वर्षांनी आहे मोठी, कोणाची आहे सर्वात जास्त नेटवर्थ?
बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ७ नोव्हेंबर रोजी आपल्या चाहत्यांना सकाळी सकाळीच एक मोठी गोड बातमी दिली आहे. कतरिनाने आज सकाळी एका मुलाला जन्म दिला आहे. मुलगा झाल्याच्या आनंदात या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक गुडन्यूज पोस्ट शेअर केली आहे. कतरिना आणि विकी आई-वडील झाल्याबद्दल सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहते तर आहेतच, पण सेलिब्रिटींकडूनही या स्टार कपलला खूप शुभेच्छा मिळत आहेत.
विकी आणि कतरिना त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या एक महिना आधीच पालक झाले आहेत. या जोडप्याने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती आणि आता आपल्या पहिल्या अपत्याला मिळून ते खूप आनंदी आहेत. या निमित्ताने, आपण विकी आणि कतरिना यांच्यातील वयाचा फरक आणि दोघांची एकूण संपत्ती किती आहे, हे जाणून घेऊया.
दोघांच्या वयात किती आहे अंतर?
९ डिसेंबर २०२१ रोजी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी राजस्थानमध्ये शाही विवाह केला होता, पण या जोडप्याच्या अफेअरची चर्चा २०१९ पासूनच सुरू झाली होती. विकीने एका कार्यक्रमात सलमान खान समोरच कतरिनाला लग्नासाठी प्रपोज केले होते, पण त्यावेळी ते सर्वांना गंमत वाटली होती. मात्र, हळूहळू जेव्हा कतरिना आणि विकी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करू लागले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यावर शंका आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कतरिना तिच्या स्टार पती विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. कतरिना सध्या ४२ वर्षांची आहे, तर विकी ३७ वर्षांचा आहे.
नेटवर्थबाबतीत कोण जास्त श्रीमंत?
विकी कौशलने २०१२ मध्ये, तर कतरिना कैफने २००३ मध्ये 'बूम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कतरिनाला बॉलिवूडमध्ये २२ वर्षे झाली आहेत, तर विकी कौशलला १३ वर्षे झाली आहेत. रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकीची एकत्रित एकूण संपत्ती २६५ कोटी रुपये आहे. यामध्ये कतरिनाची संपत्ती २२४ कोटी आणि विकीची संपत्ती ४१ कोटी आहे. विकी एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो. विकीने त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'छावा' चित्रपटासाठी १० कोटी मानधन घेतले होते. तर, कतरिना एका चित्रपटासाठी १५ ते २० कोटी फी घेते. कतरिनाने तिचा मागील चित्रपट 'मेरी ख्रिसमस' (२०२४) साठी १५ कोटी, तर 'टायगर ३' साठी १५ ते २० कोटी रुपये मानधन घेतले होते.