ओळखलंत का लखनऊतल्या या चिंटू त्यागीला, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 14:59 IST2019-02-05T14:57:41+5:302019-02-05T14:59:18+5:30
कार्तिक आर्यनने आगामी सिनेमातील त्याचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ओळखलंत का लखनऊतल्या या चिंटू त्यागीला, जाणून घ्या याबद्दल
ठळक मुद्दे'पति पत्नी और वो' चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत दिसणार भूमी पेडणेकर व अनन्या पांडे
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यनने 'सोनू के टीटू की स्वीटी' सिनेमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. या सिनेमातील त्याच्या भूमिकेला तरूणींना अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आता तो आगामी सिनेमा 'लुका छुपी'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाशिवाय तो 'पति पत्नी और वो'मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील त्याचा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
कार्तिकने स्वतः 'पति पत्नी और वो' चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला असून कॅरेक्टरचे नावदेखील सांगितले आहे. त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले की, 'भेटा लखनऊच्या चिंटू त्यागी जीला'.
कार्तिकने फोटोमध्ये साधा चेक्सचा शर्ट परिधान केला आहे. त्याचा हा लूक पाहून तो मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची कथा पाहायला मिळणार असे दिसते आहे. इतकेच नाही तर त्याने मूछही ठेवली आहे. त्यामुळे या लूकमध्ये तो खूप वेगळा दिसतो आहे.
'पति पत्नी और वो' चित्रपटात कार्तिक आर्यन अभिनेत्री भूमी पेडणेकर व अनन्या पांडेसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, जुनो चोप्रा व अभय चोप्रा करणार आहे. हा सिनेमा १९७८ साली प्रदर्शित झालेला 'पति पत्नी और वो'चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेते संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत विद्या सिन्हा व रंजीता कौरदेखील मुख्य भूमिकेत होते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन बलदेव राज चोप्रा यांनी केले होते. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे.
कार्तिकचा लुका छिपी चित्रपट १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यात त्याच्यासोबत अभिनेत्री कृति सेनॉन झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत.