फायनली...! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यनारायण की कथा’चं नाव बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 13:54 IST2021-07-04T13:54:36+5:302021-07-04T13:54:58+5:30
Satyanarayan Ki Katha controversy : साजिद नाडियाडवाला निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमाची घोषणा होताच त्यावर वाद सुरू झाला होता.

फायनली...! कार्तिक आर्यनच्या ‘सत्यनारायण की कथा’चं नाव बदलणार
अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) अलीकडे ‘सत्यनारायण की कथा’ (Satyanarayan Ki Katha) या सिनेमाची घोषणा केली होती. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमाची घोषणा होताच, एका वादाला तोंड फुटले होते. हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत, त्याविरोधात मोर्चा उघडला होता. भोपाळमध्ये ‘संस्कृती बचाओ मंच’ या हिंदू संघटनेने तर या टायटलला विरोध करत, साजिद नाडियाडवाला भोपाळमध्ये आलाच तर त्याचे तोंड काळे करून गाढवावर मिरवणूक काढण्याचा इशारा दिला होता. इतक्या सगळ्या वादानंतर अखेर या सिनेमाचे नाव बदलण्यात आले आहे. (Satyanarayan Ki Katha film controversy)
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या कार्तिकने सिनेमाचे नाव बदलण्यात आल्याची माहिती दिली. समीर विद्वांसचे ट्वीट शेअर करत त्याने ही माहिती दिली.
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) July 3, 2021
‘कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही आगामी चित्रपट सत्यनारायण की कथा या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. निर्मात्यांनी आणि क्रिएटीव्ह टीमने यासाठी पाठींबा दिला आहे. या चित्रपटाच्या नव्या नवाची घोषणा लवकरच करण्यात येईल,’ असे समीर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
‘सत्यनारायण की कथा’ ही एक रोमॅन्टिक म्युझिकल सिनेमा आहे. साजिदसोबतचा कार्तिकचा हा पहिला सिनेमा असणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात चित्रपटाच्या नावावरून झालेला वाद बॉलिवूडसाठी नवा नाही. याआधीही वादांच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटांच्या नावात बदल करण्यात आला होता. गेल्यावर्षी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ या सिनेमाच्या नावावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. सैफ अली खानच्या ‘तांडव’ या वेबसीरिजवरूनही मोठा वाद झाला होता.