कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाचा 'तू मेरी जिंदगी है' कधी प्रदर्शित होणार; निर्मात्यांचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:21 IST2026-04-01T11:20:37+5:302026-04-01T11:21:28+5:30
कार्तिक आर्यनच्या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

कार्तिक आर्यन आणि श्रीलीलाचा 'तू मेरी जिंदगी है' कधी प्रदर्शित होणार; निर्मात्यांचा मोठा निर्णय
बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या एकापाठोपाठ एक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्याच्या आगामी चित्रपटांपैकी 'तू मेरी जिंदगी है' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात कार्तिकसोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
अनुराग बसू दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामा सुरुवातीला २ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, आता ताज्या वृत्तानुसार या तारखेत बदल करण्यात आला आहे. वर्षाच्या शेवटी येणाऱ्या मोठ्या चित्रपटांशी होणारी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
'रामायण' आणि 'किंग'मुळे घेतला निर्णय?
नोव्हेंबर २०२६ मध्ये नितेश तिवारींचा बिग बजेट 'रामायणम भाग १' प्रदर्शित होत आहे, तर डिसेंबरमध्ये शाहरुख खानचा 'किंग' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन महाकाय चित्रपटांच्या गर्दीत आपला चित्रपट अडकू नये, म्हणून दिग्दर्शक अनुराग बसू 'तू मेरी जिंदगी है' ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत. ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याला बॉक्स ऑफिसवर मोकळे मैदान मिळण्याची शक्यता आहे.
कार्तिक-श्रीलीलाची फ्रेश जोडी
कार्तिक आणि श्रीलीला ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अनुराग बसू यांचे दिग्दर्शन आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असणार आहे. जरी ऑक्टोबरच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी चित्रपटसृष्टीत मात्र याचीच चर्चा रंगली आहे.