कार्तिक आर्यनच्या घरी लगीनघाई, हळदी समारंभात केली धमाल, कुणाच्या नावाचा काढला टॅटू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:57 IST2025-12-04T14:57:00+5:302025-12-04T14:57:21+5:30
हळद समारंभातील कार्तिकचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कार्तिक आर्यनच्या घरी लगीनघाई, हळदी समारंभात केली धमाल, कुणाच्या नावाचा काढला टॅटू?
Kartik Aaryan : बॉलिवूडचा लाडका 'शहजादा' कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी 'तू मेरी मैं तेरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कार्तिक मेहनत घेतोय. पण, या व्यस्त वेळापत्रकातून अभिनेत्याने त्याच्या कुटुंबासाठी वेळ काढला आहे. कार्तिकची सख्खी बहीण कृतिका तिवारी विवाहबंधनात अडकत आहे. कृतिकाच्या लग्नापूर्वीच्या विधींना जोरदार सुरुवात झाली असून काल तिचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी बहिणीच्या हळदीत कार्तिक आर्यननं धमाल केली. या खास सोहळ्यातील कार्तिकचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हळदी समारंभासाठी कार्तिकनं पिवळ्या रंगाचा आकर्षक कुर्ता परिधान केलेला. यावेळी तो खूपच उत्साही दिसून आला. कार्तिकने सलमान खानच्या "जीने के हैं चार दिन" या सुपरहिट गाण्यावर मित्रांसोबत जोरदार डान्स केला. तसेच "कजरा रे" या गाण्यावरही त्याने ठेका धरला. एका व्हिडीओमध्ये, कार्तिक अत्यंत प्रेमाने बहिणीला हळद लावताना आणि तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करताना दिसत आहे.
कार्तिकने एका खास कृतीमधून त्याचं बहिणीवरचं असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. त्याने त्याच्या मनगटावर 'टिक्की' (Tikki) नावाचा टॅटू काढला. कृतिका तिवारीचे लग्न आज, ४ डिसेंबर रोजी ग्वाल्हेरमध्ये पार पडणार आहे. दुसरीकडे, कार्तिकचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असून, सध्या त्याचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. कामात कितीही व्यस्त असला तरी, कार्तिक मात्र बहिणीच्या लग्नाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगताना दिसला आहे.
कार्तिकची बहिण कृतिका ही एक डॉक्टर आहे. विशेष म्हणजे कार्तिकच्या कुटुंबातील सर्वजण डॉक्टर आहेत. आई माला तिवारी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, तर वडील मनीष तिवारी हे बालरोगतज्ज्ञ आहेत. घरात सर्व जण डॉक्टर असताना कार्तिकने मात्र वेगळेच क्षेत्र निवडले. विशेष म्हणजे अभिनयात येण्यापूर्वी त्याने इंजिनियरिंगसाठी प्रवेश घेतला होता. अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर फक्त आपल्या आईच्या आग्रहास्तव कार्तिकनं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं.