'कभी खुशी कभी गम २' येणार? करण जोहरने केली स्क्रिप्ट लॉक; कास्टिंगवरही आलं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:01 IST2026-01-05T13:00:35+5:302026-01-05T13:01:08+5:30
करण जोहर घेऊन येतोय फॅमिली ड्रामा, लवकरच सुरु होणार प्री प्रोडक्शन

'कभी खुशी कभी गम २' येणार? करण जोहरने केली स्क्रिप्ट लॉक; कास्टिंगवरही आलं अपडेट
बॉलिवूडमधील गाजलेल्या सिनेमांची नावं घ्यायची तर 'कुछ कुछ होता है','कभी खुशी कभी गम' ही नावं येतातच. करण जोहरने हे सिनेमे दिग्दर्शित केले होते ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही हे दोन्ही सिनेमे चाहत्यांच्या हृदयाजवळ आहेत. २००१ साली आलेल्या 'कभी खुशी कभी गम'मध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, राणी मुखर्जी, काजोल, करीना कपूर असे दिग्गज कलाकार होते. आता इतक्या वर्षांनी सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे.
पिंकविला रिपोर्टनुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला मिळालेल्या यशानंतर करण जोहर पुन्हा फॅमिली ड्रामा सिनेमा बनवण्याच्या तयारित आहे. सिनेमाचं स्क्रिप्टही फायनल झालं आहे. यावर्षाच्या मध्यापर्यंत सिनेमाचं शूट सुरु होणार असल्याची शक्यता आहे. हा एक हाय ऑक्टेन फॅमिली ड्रामा असमार आहे ज्यात रोमँटिक आणि इमोशनल अँगल आहेत. सिनेमाच्या कास्टिंगबद्दल सांगायचं तर सिनेमात दोन मुख्य अभिनेते आणि दोन मुख्य अभिनेत्री असणार आहेत. कास्टिंगची प्रक्रिया लवकरच सुरु होईल. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन बॅनर अंतर्गत रिलीज होणारा हा सर्वात मोठा सिनेमा असणार आहे. याचं नाव 'कभी खुशी कभी गम २' असेल अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
'कभी खुशी कभी गम २' हा पहिल्या पार्टचा सीक्वेल असणार की पूर्ण गोष्टच वेगळी असणार यावर काहीही कन्फर्मेशन आलेलं नाही. मात्र ९० च्या दशकातील चाहत्यांना करण जोहरच्या सिनेमातून पुन्हा तोच काळ अनुभवता येणार आहे. करण जोहर फॅमिली ड्रामा बनवण्यात तरबेज आहे. तसंच त्याच्या दिग्दर्शित सिनेमाची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे आता या बातमीनंतर 'के३जी'चे चाहते उत्सुक आहेत.