"९२ व्या वर्षीही तितकंच चांगलं...", काजोलने आशा भोसले यांच्यासाठी केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:09 IST2025-09-09T14:08:24+5:302025-09-09T14:09:15+5:30
लाडक्या आशा ताईंसाठी काजोलची खास पोस्ट, म्हणाली...

"९२ व्या वर्षीही तितकंच चांगलं...", काजोलने आशा भोसले यांच्यासाठी केली खास पोस्ट
Kajol Post For Asha Bhosle: भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या दिग्गज गायिका म्हणून आशा भोसले यांना ओळखलं जातं. आशा भोसले यांनी वयाची नव्वदी ओलांडली तरीही आजही त्या सळसळत्या एनर्जीने सर्वांना प्रेरीत करतात. काल सोमवारी (८ सप्टेंबर) आशा भोसले यांचा ९२ वा वाढदिवस होता. संपूर्ण मनोरंजन विश्वातून आशा भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. बॉलिवूडची स्टार अभिनेत्री काजोलने आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. काजोलच्या या पोस्टमधून तिचे आशाताईंवर किती प्रेम आहे, हे दिसून आलं.
काजोलने २०१४ सालचा एक जुना फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो एच.एन. रिलायन्स रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या रात्रीचा आहे. या फोटोत काजोल, अभिनेता सैफ अली खान आणि आशा भोसले दिसत आहेत. या फोटोसोबत काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले, "२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात एचएन रिलायन्स रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या रात्रीची ही आठवण! अंदाज लावा कोण आजही तितकंच चांगलं दिसतंय आणि काम करत आहे. तर ती व्यक्ती मी किंवा सैफ अली खान नाही, तर आशा भोसले या आहेत. महान दिग्गज आशा भोसले यांना पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा! ही पोस्ट करायलाच हवी होती! लव्ह यू आशाताई!", असं काजोलनं म्हटलं. काजोलच्या या पोस्टवर आशा भोसले यांनीही कमेंट बॉक्समध्ये 'हार्ट' इमोजी पोस्ट केलं.
आशाताईंचा उत्साह आजही कायम
९२ व्या वर्षीही आशा भोसले यांचा उत्साह आणि कामाची आवड कायम आहे. आजही त्या मंचावर येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि डोळ्यांतील चमक तरुणांनाही लाजवेल अशी असते. विशेष म्हणजे आशा भोसले केवळ गायिकाच नसून त्या प्रसिद्ध व्यवसायिकादेखील आहेत. त्यांचं दुबईत एक आलिशान रेस्टॉरंट आहे. आशा भोसले यांना वेळ मिळेल तशा त्या या रेस्टॉरंटला भेट देत असतात. इतकंच नाही तर त्या या रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा भारतीय पदार्थ तयार करुन ते ग्राहकांना प्रेमाने जेवू घालतात.