'ॲनिमल पार्क'मध्ये 'कबीर सिंह'चा क्रॉसओव्हर? शाहिद कपूरने दिलं उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:23 IST2026-02-09T15:23:13+5:302026-02-09T15:23:48+5:30
शाहिद कपूरला ॲनिमल पार्क मध्ये कबीर सिंहच्या क्रॉसओव्हरबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला..

'ॲनिमल पार्क'मध्ये 'कबीर सिंह'चा क्रॉसओव्हर? शाहिद कपूरने दिलं उत्तर, म्हणाला...
साउथ दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी 'कबीर सिंह' आणि 'ॲनिमल' या सिनेमांमुळे बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान मिळवलं आहे. त्यांच्या सिनेमाची शैली, त्यांची स्टाईल आता बॉलिवूडला अवगत झाली आहे. बहुतांश प्रेक्षकवर्गालाही त्यांचे सिनेमे पसंतीस पडत आहेत. कबीर सिंह मधून शाहिद कपूर आणि 'ॲनिमल' सिनेमातून रणबीर कपूरच्या करिअरला वेगळं मिळालं. दरम्यान आता 'ॲनिमल'चा सीक्वेल 'ॲनिमल पार्क'मध्ये 'कबीर सिंह'ही दिसणार असल्याची चर्चा होती. यावर शाहिद कपूरने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
शाहिद कपूरला ॲनिमल पार्क मध्ये कबीर सिंहच्या क्रॉसओव्हरबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, "जेव्हा संदीप रेड्डी वांगा ॲनिमल बनवत होते तेव्हाच खरंतर या कल्पनेवर विचार करण्यात आला होता. संदीप मला भेटायला आला होता. सिनेमात कबीर सिंहचा एक सीन असावा असं त्याला वाटत होतं पण ते होऊ शकलं नाही. तारखांचा इश्यू झाला किंवा दुसरा काहीतरी प्रॉब्लेम झाला पण त्यामुळे ही कल्पना जमवून आणता आली नाही. पण हो, त्याने मला एका सीनसाठी विचारणा केली होती."
तो पुढे म्हणाला, "कबीर सिंह आणि ॲनिमल दोन्ही सिनेमे संदीप वांगा यांचेच आहे. त्यामुळे भविष्यातही दोन्ही भूमिकांचा क्रॉसओव्हर व्हायचा असेल तर ते पूर्णपणे वांगा यांच्या व्हिजनवरच अवलंबून आहे. त्या दोन्ही भूमिकांचं काय करायचं ते तेच ठरवतील."
शाहिद कपूर आगामी विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमिओ' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत तृप्ती डिमरी आहे. शिवाय नाना पाटेकर, अविनाश तिवारी, फरिदा जलाल, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया आणि दिशा पाटनी यांच्याही भूमिका आहेत.