A k Hangal Death Anniversary: अॅम्बुलन्समधून आलेत अन् शॉट ओके करून रूग्णालयात गेले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:17 IST2019-08-26T16:13:15+5:302019-08-26T16:17:26+5:30
इतना सन्नाटा क्यों है भाई ? हा संवाद आठवला की, डोळ्यासमोर येतो तो ए. के. हंगल यांचा चेहरा.

A k Hangal Death Anniversary: अॅम्बुलन्समधून आलेत अन् शॉट ओके करून रूग्णालयात गेले...!
इतना सन्नाटा क्यों है भाई ? हा संवाद आठवला की, डोळ्यासमोर येतो तो ए. के. हंगल यांचा चेहरा. होय, ज्येष्ठ अभिनेते ए.के.हंगल यांनी ‘शोले’ या चित्रपटात इमाम साहेबांची व्यक्तिरेखा साकारली होती. सुमारे 225 चित्रपटांमध्ये झळकलेल्या हंगल यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले होते. 26 ऑगस्ट 2012 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आज त्यांचा स्मृती दिन.
आश्चर्य वाटेल पण हंगल यांनी वयाच्या 52 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. बासु भट्टाचार्य यांच्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांचे पूर्ण नाव अवतार किशन हंगल होते. लोक त्यांना ए.के. हंगल या नावानेच ओळखायचे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1993 मध्ये ए. के. हंगल यांच्या चित्रपटांवर बंदी लादली होती. पाकिस्तान समर्थक असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. याकाळात दोन वर्षे त्यांना कुठल्याच चित्रपटाची ऑफर मिळाली नव्हती.
आमिर खानच्या ‘लगान’मध्ये त्यांनी गावच्या मुखियाचे पात्र साकारले होते. या शूटींगवेळी त्यांना कंबरदुखीचा असह्य त्रास होत होता. शूटींग थांबवावे लागेल की काय अशी भीती आमिरला वाटू लागली होती. पण हंगल शब्दांचे पक्के होते. ते अॅम्बुलन्समधून ते सेटवर आलेत आणि वेदना सोसत शॉट ओके केला आणि नंतर पुन्हा रूग्णालयात गेले.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हंगल यांना अखेरच्या काळात एका छोट्याशा खोलीत जीवन व्यतीत करावे लागले होते. वयाच्या 95 व्या वर्षी ते खंडर झालेल्या घरात आपल्या मुलासोबत राहात होते.