सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:57 IST2025-12-01T09:55:59+5:302025-12-01T09:57:31+5:30
सनी देओलसोबत लिपलॉक करताना जुही चावलाला वाटलेला संकोच, कारण...

सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
सनी देओल आणि जुही चावला यांचा सिनेमा म्हटलं की 'डर' हेच नाव येतं. मात्र या दोघांनी १९९३ साली 'लुटेरे' या सिनेमातही एकत्र काम केलं होतं. या सिनेमात दोघांचा लिपलॉक सीनही होता. मात्र तो सीन करण्यासाठी जुहीला संकोच वाटत होता. अनेकदा कारणं दिल्यानंतर शेवटी तिने तो सीन केला होता. आता नुकतंच निर्मात्यांनी इतक्या वर्षांनी तो किस्सा सांगितला आहे.
बॉलिवूड बबलशी बोलताना निर्माते सुनील दर्शन म्हणाले, "लुटेरे हा जुही चावलाच्या करिअरमधला सर्वात महत्वाचा सिनेमा होता. मात्र त्याबद्दल फारसं कधीच बोललं गेलं नाही. मी तिच्या 'कयामत से कयामत तक' आणि 'सल्तनत' या दोन्ही सिनेमांचं वितरण केलं होतं. जुहीमध्ये खूप कौशल्य होतं म्हणूनच आम्ही तिला लुटेरे मध्ये कास्ट केलं. मात्र तिला सिनेमात दिली गेलेल्या जास्तच मॉडर्न आणि वेस्टर्न इमेजच्या भूमिकेबद्दल थोडी काळजी वाटत होती."
ते पुढे म्हणाले, "सिनेमात बीचवर चित्रीत झालेलं एक गाणं होतं ते म्हणजे 'मै तेरी रानी तू राजा'. यामध्ये जुहीला फक्त एक शर्ट घालून भिजायचं होतं. जुहीला हे करताना खूप संकोच वाटला. याच काळात दिव्या भारती नाव मोठं होत होतं. तिलाही सिनेमा करायचा होता. पण मला वाटलं की ती या भूमिकेसाठी योग्य नाही. म्हणून मी धर्मेश आणि जुहीलाच घेतलं आणि जुहीचं एन्ट्री झाली. जुहीची प्रतिमा गर्ल नेक्स्ट डोर सारखी होती. त्यामुळे तिला ग्लॅमरस दाखवणं जरा कठीण होतं. जुहीने होकार दिला होता पण ती जरा गोंधळली होती. आज आठवलं तर हे सगळं जरा बालिश वाटतं पण एक मजेशीर घटनाही घडली होती. जेव्हा जुहीला आम्ही स्क्रिप्ट ऐकवली आणि कॉन्ट्रॅक्ट साईन केला तेव्हा जूही आणि सनी यांच्यात किसींग सीन होता. जेव्हा आम्ही शूट करायला लागलो तेव्हा हा सीन शेवटी होता. आम्ही आऊटडोरला सेट लावला पण शूटदिवशी समजलं की जुही गायब आहे. जुहीने त्या दिवशी उदयपूरमध्ये दुसरं शूट आहे असं कारण दिलं आणि शूटिंग टाळलं. पण मी म्हणालो की हा सीन नंतर नक्कीच शूट करावा लागेल कारण ही कथेची गरज आहे."
"प्रत्यक्ष शूट करताना मी धर्मेशला सल्ला दिला की जास्त कॅमेरे लावून एकाच टेकमध्ये शूट कर. जसा सीन शूट झाला जुही रोब घालून तिथून लगेच निघून गेली. पण मेकर्सला आणखी एक टेक घ्यायचा होता. तर जुही म्हणाली की कॉन्ट्रॅक्टनुसार मला एक सीन करायचा होता तो मी केला. आज ते आठवून हसू येतं. आम्ही रिटेक घेतला नाही आणि पहिलाच टेक फायनल केला. ही जुहीच्या करिअरमधली खास फिल्म होती. पूर्ण सिनेमा तिच्याच अवतीभोवती फिरतो. त्या काळी हिरोईन सेंट्रिक सिनेमा मोठी गोष्ट होती."