'या' सुपरस्टारला सेटवर जया बच्चन यांनी काठीनं झोडपलं होतं, अभिनेता म्हणाला "मला खूपच जोरात लागलं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:06 IST2025-09-25T15:04:27+5:302025-09-25T15:06:30+5:30
नुकतंच एका लोकप्रिय अभिनेत्यानं जया यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.

'या' सुपरस्टारला सेटवर जया बच्चन यांनी काठीनं झोडपलं होतं, अभिनेता म्हणाला "मला खूपच जोरात लागलं"
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमी त्यांच्या रागीट स्वभावामुळे ओळखल्या जातात. अनेकदा फोटो काढण्यावरून त्या चाहते आणि पापाराझींवर चिडलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोलही केलं आहे. अशातच एका सुपरस्टानं खुलासा केली की जया बच्चन यांनी त्याला एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान छडीनं झोडपलं होतं.
तो अभिनेता आहे भोजपुरी सुपरस्टार निरहुआ (दिनेश लाल यादव). निरहुआनं २०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'गंगा देवी' या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. नुकतंच एका मुलाखतीत निरहुआ याने अमिताभ आणि जया यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.
चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्यावर निरहुआ सुरुवातीला खूप घाबरला होता. निरहुआ म्हणाला, "अमिताभ बच्चन खूप चांगले माणूस आहेत. त्यांनी माझी अवस्था ओळखली आणि मला सहज वाटावे यासाठी त्यांनी काही विनोद सांगितले, तसेच माझ्या गाण्यांबद्दल बोलून वातावरण हलके केले".
निरहुआनं जया बच्चन यांच्यासोबतच्या एका सीन शुटिंगचा अनुभवही सांगितला. तो म्हणाला, "एक सीन होता जिथे मला माझ्या ऑन-स्क्रीन पत्नीला कानशिलात मारायची होती आणि माझ्या आईची भूमिका साकारणाऱ्या जयाजींनी मला ओरडून काठीने मारायचं होतं. पण अभिनय करण्याऐवजी त्यांनी मला खरंच मारलं. यावर मी जया बच्चन यांना ओरडून सांगितलं की, तुम्ही मला खरंच मारताय... तर त्या म्हणाल्या की, मग तू माझ्या सुनबाईला का मारलंस? मी म्हणालो की, अहो ते फक्त शुटिंगसाठी अभिनय होता. पण तुम्ही तर खरंच मला मारलं".
निरहुआनं पुढे सांगितलं, "कदाचित ते अनावधानाने झाले असेल, पण मला खूप दुखलं होतं. तरीसुद्धा मी त्याला प्रसाद मानले. कारण किती लोकांना जया बच्चन आणि अमिताभ बच्चन या दोघांसोबत काम करण्याची संधी मिळते?".