"अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि 'दिल से' महाराष्ट्रीयन", जान्हवी कपूरनं शेअर केली स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:20 IST2025-08-18T18:16:50+5:302025-08-18T18:20:02+5:30
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

"अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि 'दिल से' महाराष्ट्रीयन", जान्हवी कपूरनं शेअर केली स्टोरी
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या आपल्या चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळेही चर्चेत आहे. नुकतीच ती मुंबईतील दहीहंडी उत्सवात सहभागी झाली होती.घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्याकडून दहिहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राम कदम यांच्या दहिहंडी उत्सव कार्यक्रमाला जान्हवी कपूरला बोलावलं होतं. या कार्यक्रमात जान्हवीने मराठीत संवाद साधला आणि प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या मराठी बोलण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या कार्यक्रमानंतर जान्हवीनं इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत महाराष्ट्रावरील प्रेम व्यक्त केलं.
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर दहीहंडी उत्सवातील एक फोटो शेअर केला. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि दिल से महाराष्ट्रीयन". तिच्या या कॅप्शननं मराठी चाहत्यांचं मन जिंकलं. जान्हवीच्या आई श्रीदेवी या मुळच्या दाक्षिणात्य, तर वडील बोनी कपूर पंजाबी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे जान्हवीवर दाक्षिणात्य आणि पंजाबी संस्कार झालेत. तर मुंबईत वाढ झाल्याने जान्हवीचं मराठी संस्कृतीशीही घट्ट नातं आहे. म्हणूनच तिनं स्वतःला 'दिल से महाराष्ट्रीयन' असं म्हटलं.
विशेष म्हणजे जान्हवी ही महाराष्ट्राची सून होणार आहे. जान्हवी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पाहारिया याला डेट करतेय. लहानपणापासून हे दोघे एकमेकांना ओळखत असून ते जिवापाड प्रेम करतात. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा फक्त जान्हवीच नव्हे तर जान्हवीच्या कुटुंबीयांनादेखील आवडतो. मिळालेल्या माहितीनुसार 2025 सालाच्या शेवटपर्यंत शिखर आणि जान्हवी एकमेकांशी लग्न करू शकतात. या लग्नसोहळ्याची मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'परमसुंदरी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जान्हवीसोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. येत्या २९ ऑगस्टला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थचे नाव 'परम' आहे. तर जान्हवीचे नाव 'सुंदरी' असे आहे.