Sridevi Death Anniversary :आई श्रीदेवीच्या आठवणीने जान्हवी कपूर व्याकूळ! शेअर केला भावूक संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 10:10 IST2019-02-24T10:08:28+5:302019-02-24T10:10:23+5:30
आईच्या आठवणीने जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि पती बोनी कपूर यांचे डोळे आजही पाणावतात. आज आईला आठवत जान्हवीने सोशल मीडियावर एक भावूक संदेश शेअर केला आहे.

Sridevi Death Anniversary :आई श्रीदेवीच्या आठवणीने जान्हवी कपूर व्याकूळ! शेअर केला भावूक संदेश!
बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी यांचा आज पहिला स्मृतीदिन. गतवर्षी आजच्याच तारखेला म्हणजे २४ फेब्रुवारीला श्रीदेवी यांनी दुबईत अंतिम श्वास घेतला होता. श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी, त्यांचे अजरामर सिनेमे कायम सीनेप्रेमींच्या मनात जिवंत असतील. श्रीदेवींचे अख्खे कुटुंब आजही या धक्यातून सावरलेले नाही. आईच्या आठवणीने जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि पती बोनी कपूर यांचे डोळे आजही पाणावतात. आज आईला आठवत जान्हवीने सोशल मीडियावर एक भावूक संदेश शेअर केला आहे. सोबत आईचा एक सुंदर फोटोही तिने पोस्ट केला आहे. यात श्रीदेवी छोट्या जान्हवीचा हात हातात घेऊन आहेत. ‘माझे मन तुझ्या आठवणीने नेहमी भरून येते. पण मी कायम हसत राहिल. कारण यात तू आहेस,’ असे जान्हवीने लिहिले आहे.
जान्हवी कपूर आपल्या आईच्या अतिशय जवळ होती. मुलीला मोठ्या पडद्यावर स्टार म्हणून बघणे श्रीदेवींचे स्वप्न होते. आजघडीला श्रीदेवींचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. पण जान्हवीचे स्टारपण पाहण्यासाठी श्रीदेवी या जगात नाहीत. श्रीदेवींच्या अंतिम क्षणीही जान्हवी त्यांच्यासोबत नव्हती.
मृत्यूच्या वर्षाभरानंतरही सोशल मीडियावर श्रीदेवींचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. दुबईतील एका कौटुंबिक सोहळ्यातील हे फोटो आहेत. श्रीदेवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटववर पोस्ट केलेल्या या फोटोत त्या आपल्याला पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबीयातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत. श्रीदेवी या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगल्याच अॅक्टिव्ह होत्या. त्यानी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा सगळ्यात शेवटचा फोटो आहे.