"आईच्या निधनानंतर अनेकांनी माझा गैरफायदा घेतला"; स्ट्रगल काळ आठवून जान्हवी कपूर भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:35 IST2026-04-08T09:27:19+5:302026-04-08T09:35:26+5:30

Janhvi kapoor: जान्हवीने अलिकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

janhvi-kapoor-heartbroken-by-the-death-of-her-mother-sridevi-remembering-her-struggles | "आईच्या निधनानंतर अनेकांनी माझा गैरफायदा घेतला"; स्ट्रगल काळ आठवून जान्हवी कपूर भावूक

"आईच्या निधनानंतर अनेकांनी माझा गैरफायदा घेतला"; स्ट्रगल काळ आठवून जान्हवी कपूर भावूक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अलिकडेच एका मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. आईच्या (श्रीदेवी) यांच्या निधनानंतर त्यांच्या घरची परिस्थिती कशी झाली होती, इंडस्ट्रीतील लोक त्यांच्यासोबत कसे वागले हे तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. यावेळी बोलत असतांना ती प्रचंड भावूक झाली होती. इतकंच नाही तर ''ज्या लोकांना मी जवळ केलं त्याच लोकांनी माझ्या भोळेपणाचा गैरफायदा घेतला'', असंही ती यावेळी म्हणाली.

जान्हवीने अलिकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. ''आई गेल्यानंतर मला अचानक मोठ व्हावं लागलं.  ती असतांना मी सगळे निर्णय घेण्यासाठी तिच्यावरच अवलंबून होते. अगदी काय चूक आहे, काय बरोबर, कोणते कपडे घालायचे हे सगळं मी तिलाच विचारुन करायचे. पण, ती गेल्यावर हे सगळं माझं मलाच एकटीला करावं लागलं. तो काळ खूप कठीण होता. तेव्हा लोक माझ्या कुटुंबाविषयीदेखील बरीच नको नको ती चर्चा करत होते'', असं जान्हवी म्हणाली.

पुढे ती म्हणते, ''त्या कठीण काळात माझ्याकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले गेले. मी माझ्या आयुष्यात अशा काही लोकांना स्थान दिलं. ज्यांनी माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. आई गेल्यावर मी फक्त तिलाच नाही तर वडिलांनाही गमावलं होतं. कारण, त्यांचं वागणंदेखील अचानक बदललं होतं. त्यांचं हसणं, खेळकर स्वभाव सगळा बदलला. आई असतांना त्यांचा जो स्वभाव होता तो मी आजही खूप मिस करते. आणि, मलाच याच गोष्टीचं वाईट वाटतंय की, मी आधी जसं आयुष्य होतं तसं पुन्हा करु शकत नाही.''

दरम्यान, या मुलाखतीमध्ये जान्हवीने श्रीदेवी यांच्या स्ट्रगल काळाविषयीदेखील भाष्य केलं. माझ्या आईला सगळे होमब्रेकर म्हणायचे ज्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा, असंही तिने सांगितलं. बोनी कपूर यांनी मोना कपूर यांच्यासोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलेदेखील आहेत. त्यानंतर त्यांनी श्रीदेवीसोबत दुसरा संसार थाटला. या जोडीला जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.

Web Title: janhvi-kapoor-heartbroken-by-the-death-of-her-mother-sridevi-remembering-her-struggles