सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसवर सिनेमा बनवणार आमिर खान? म्हणाला- "मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:32 IST2025-07-22T16:28:56+5:302025-07-22T17:32:30+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसवर सिनेमा बनवणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर खुद्द आमिरनेच प्रतिक्रिया दिली आहे.

सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसवर सिनेमा बनवणार आमिर खान? म्हणाला- "मला..."
मेघालयला हनिमूनसाठी गेलेल्या सोनम रघुवंशी हिने पती राजा रघुवंशीची हत्या करत मृतदेह दरीत फेकून दिला होता. प्रेमप्रकरणातून सोनमने ही हत्या केल्याचं समोर आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. अतिशय शिताफीने सोनमने तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिळून नवऱ्याचा काटा काढला होता. एखाद्या सिनेमाची स्टोरी असावी तसंच या प्रकरणातील एक एक बाबी धक्कादायक पद्धतीने समोर आल्या. आता या हनिमून मर्डर केसवर बॉलिवूड सिनेमा येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसवर सिनेमा बनवणार असल्याची चर्चा रंगली आहे. झूम आणि टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणातील प्रत्येक अपडेटवर आमिर खान लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आमिर खान यावर सिनेमा करण्याचा प्लॅन करू शकतो, असंही सांगण्यात आलं. त्यामुळे सिनेमात राजा सूर्यवंशी आणि सोनम सूर्यवंशी यांच्या भूमिका कोण साकारणार, याबाबतही चर्चा सुरू झाल्या होत्या. आता यावर खुद्द आमिरनेच प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना आमिरने यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. "या गोष्टी कुठून सुरू होताता मला खरंच माहीत नाही. पण, यात कोणंतही तथ्य नाही", असं आमिरने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सिनेमा बनत असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे.