'इन्स्पेक्टर झेंडे'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, मनोज वाजपेयींसोबत मराठी कलाकारांची फौज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:54 IST2025-08-25T13:49:57+5:302025-08-25T13:54:45+5:30
हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, त्यात मनोज वाजपेयी पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहेत.

'इन्स्पेक्टर झेंडे'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, मनोज वाजपेयींसोबत मराठी कलाकारांची फौज!
Inspector Zende Official Trailer: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी 'इन्स्पेक्टर झेंडे' (Inspector Zende) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, त्यात मनोज वाजपेयी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटातमध्ये मराठी कलाकारांची तगडी फौज आहे.
'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटे ३२ सेकंदांचा असून, त्यात एका सामान्य पोलिस अधिकाऱ्याची असामान्य कथा दाखवण्यात आली आहे. हा अधिकारी केवळ आपल्या हिमतीवर आणि 'जुगाड'च्या मदतीने एक अशक्य वाटणारा गुन्हा कसा सोडवतो, हे यात पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये ॲक्शन आणि कॉमेडीचा उत्तम मेळ साधण्यात आला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे.
मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला (Charles Sobhraj) दोनवेळा पकडलं होतं. त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत हा चित्रपट आहे. सिनेमात मनोज वाजपेयी 'इन्स्पेक्टर मधुकर झेंडे' यांची भूमिका साकारत असून, जिम सरभ (Jim Sarbh) 'स्विमसूट किलर' कार्ल भोजराज (चार्ल्स शोभराज) या चोराची भूमिका निभावत आहे. तर भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मनोज वाजपेयीसोबत मराठी कलाकारांची फौज असल्याने सर्वांना या सिनेमाविषयी उत्सुकता आहे. दरम्यान, हा चित्रपट चिन्मय डी. मांडलेकर यांनी दिग्दर्शित केला असून, जय शेवकरमाणी आणि ओम राऊत यांनी त्याची निर्मिती केली आहे.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना मनोज बाजपेयी म्हणाले, "'इन्स्पेक्टर झेंडे'मध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो कधीच प्रसिद्धीच्या मागे धावला नाही. तरीही त्याने एका कुख्यात गुन्हेगाराला दोनदा पकडले. त्याचे धाडस आणि मुंबईवरील त्याचे अनोखे दृष्टिकोन खरोखरच प्रेरणादायी आहेत. त्याची भूमिका साकारताना मला एका अशा जगात जाण्याची संधी मिळाली, जे मनोरंजक आणि कठीण दोन्ही आहे. ट्रेलर केवळ एक झलक आहे, चित्रपट तुम्हाला थेट त्याच्या हृदयाला भिडणार आहे. या कथेला आता प्रसिद्धी मिळतेय याचा मला आनंद आहे".