ओम राऊतने वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमाची घोषणा, मनोज वाजपेयी-भाऊ कदम प्रमुख भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:00 IST2025-08-07T13:59:39+5:302025-08-07T14:00:04+5:30
चिन्मय मांडलेकरने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं असून मनोज वाजपेयीसोबत अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकणार आहेत

ओम राऊतने वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण, 'इन्स्पेक्टर झेंडे' सिनेमाची घोषणा, मनोज वाजपेयी-भाऊ कदम प्रमुख भूमिकेत
७०-८० च्या दशकातल्या मुंबईच्या गल्ल्यांमध्ये एक गुंड बिनधास्त वावरत होता. हा कुख्यात 'स्विमसूट किलर' तिहार जेलमधून फरार होतो, तेव्हा एक शूर पोलिस अधिकारी त्याला पकडण्याचा निर्धार करतो. खऱ्या घटनांवर आधारित ही कथा जिद्द आणि धाडसाची आहे, जी अत्यंत रोमांचक आहे. मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला दोनवेळा पकडलं होतं. त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलंय.
‘इन्स्पेक्टर झेंडे’ची उत्सुकता
या सिनेमात लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयी ‘इन्स्पेक्टर मधुकर झेंडे’ यांची भूमिका साकारत असून, जिम सरभ ‘स्विमसूट किलर’ कार्ल भोजराज या हुशार चोराची भूमिका निभावत आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले आहे. भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मनोज वाजपेयीसोबत मराठी कलाकारांची फौज असल्याने सर्वांना या सिनेमाविषयी उत्सुकता आहे.
‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा भारतीय पोलिसांच्या कामगिरीला सलाम करणारा एक सिनेमा आहे. याची निर्मिती ओम राऊतने केली आहे. या सिनेमाविषयी ओम राऊत म्हणतात, “इन्स्पेक्टर झेंडेची गोष्ट ही बघितली गेली पाहिजे, लक्षात ठेवली पाहिजे आणि साजरी केली पाहिजे. ही एक अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायक केसची कथा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इन्स्पेक्टर झेंडेवर चित्रपट बनवणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. नेटफ्लिक्ससोबत ही कथा पडद्यावर आणण्याचा प्रवास अत्यंत सुंदर राहिला आहे." ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा सिनेमा ५ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.