"अभिमानाने उर भरून येतोय..." मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईची खास पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:34 IST2025-08-05T10:19:17+5:302025-08-05T10:34:21+5:30
मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईनं धडाधड १२ ते १३ स्टोरीज केल्या शेअर

"अभिमानाने उर भरून येतोय..." मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईची खास पोस्ट, म्हणाली...
Zanai Bhosle on Siraj, IND vs ENG 5th Test Day 5: भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका चर्चेचा विषय बनली. भारताने ओव्हल कसोटी सामन्यात इंग्लंडविरोधात (IND vs ENG) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने २-२ अशी बरोबरी करत इंग्लंडला धूळ चारली आहे. शेवटी रोमांचक वळणावर आलेल्या सामन्यात सिराजने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. अत्यंत हुशारीने इंग्लंडच्या फलंदाजांना चीत करत भारताला विजय मिळवून दिला आहे. तो या सामन्याचा हिरो ठरला. या सामन्यानंतर मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव होतोय. लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने मोहम्मद सिराजसाठी (Zanai Bhosle Appreciation For Siraj) खास पोस्ट केली आहे.
आशा भोसले यांची नात जनाई भोसले ही मोहम्मद सिराजला डेट करत असल्याचीही चर्चा काही दिवसांपुर्वी रंगली होती. तेव्हा जनाई भोसलेनं अफवांचे खंडन केलं होतं. सिराज आणि ती भाऊ-बहीण असल्याचे जनाईनं स्पष्ट केलं होतं. आता जनाईनं आपल्या मानलेल्या भावासाठी इंस्टाग्रामवर एकामागून एक तब्बल १२ ते १३ स्टोरीज शेअर करत त्याच्या खेळीचं कौतुक केलं.
जनाईनं सिराजसोबतचा फोटो शेअर करत लिहलं, "ज्या दिवसापासून मी सिराज भाईंना भेटलेय, त्या दिवसापासून मी त्यांची तत्व आणि व्यक्तिमत्त्वानं सतत प्रेरित झाले आहे. ते असे आहेत जे तुम्हाला खरोखरच 'जादू'वर विश्वास ठेवायला लावतील.माझ्याकडे शब्दच नाहीत. पण, तुमच्यासारखं पर कुणीच नव्हतं आणि नसेलही! आमच्या सर्वांचं हृदय तुमच्यासोबत भारतासाठी धडधडतं", असं तिनं म्हटलं. तर आणखी एका स्टोरीमध्ये तिनं लिहलं, "हीच ती जिद्द, हेच सर्व काही आहे!!". याशिवाय जनाईनं "अभिमानाने उर भरून येतोय, स्वतःला थांबवूही शकत नाही" अशी इन्स्टास्टोरी पोस्ट केली.
जनाई भोसले कोण आहे?
जनाई भोसले ही आशा भोसले यांची नात असून, तिने अनेक गाणी आणि अल्बम्समध्ये आपला आवाज दिला आहे. लवकरच ती 'द प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. जनाई सोशल मीडियावरही अत्यंत सक्रिय असून तिच्या पोस्ट नेहमी चर्चेत असतात.