"सिनेमांमध्ये माझा वापर साहित्यासारखा केला गेला...", शहनाज गिलने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:15 IST2025-12-05T10:14:33+5:302025-12-05T10:15:20+5:30
Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, चित्रपटांमध्ये तिचा वापर एका सजावटीच्या वस्तूसारखा केला जात आहे. तिला चांगल्या कथा मिळत नसल्याचेही तिने सांगितले.

"सिनेमांमध्ये माझा वापर साहित्यासारखा केला गेला...", शहनाज गिलने व्यक्त केली खंत
पंजाबची कतरिना म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल 'बिग बॉस १३'मुळे घराघरात पोहचली. तिने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिचे एक-दोन चित्रपटही आले. नुकतीच, शहनाज गिल 'बिग बॉस १९'मध्ये तिचा भाऊ शहबाजची वाइल्डकार्ड म्हणून स्वागत करण्यासाठी आणि तिच्या 'इक्क कुड़ी' या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी सलमान खानसोबतच्या संभाषणात ती म्हणाली की, “माझ्यावर कोणी पैसे लावत नाहीये, म्हणून मी स्वतःवर लावले.” आता, एका नवीन मुलाखतीत शहनाजने या वक्तव्यामागील खरी कारणे शेअर केली आहेत.
शहनाज गिलने सांगितले की, "हे वक्तव्य तिला मिळत असलेल्या संधींतून वाढलेल्या निराशेमुळे आले आहे. तिला अनेक ऑफर मिळत आहेत, पण त्यापैकी बहुतेक ऑफर तिला केवळ एक सजावटीची वस्तू बनवतात, ज्यात तिचे कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान नसते. फरीदून शहरयार यांच्याशी बोलताना शहनाजने सांगितले, “ही गोष्ट मी यासाठी बोलले, कारण मला चांगल्या कथा मिळत नाहीयेत आणि चित्रपटांमध्ये माझा वापर एका प्रॉप (वस्तू) सारखा केला जात आहे. मी एकाच प्रकारच्या कथा वारंवार पाहतेय. त्यांच्यात काहीही खास नसते आणि कोणताही मोठा संदेश नसतो. मला अनेक ऑफर मिळत होत्या, पण मला वाटले की माझ्यावर पैसे लावणे फायदेशीर असायला हवे."
"पाच वर्षांपर्यंत पंजाबी चित्रपट नाकारले"
अभिनेत्रीने हे देखील सांगितले की, "सतत पंजाबी प्रोजेक्ट्स ऑफर होऊनही तिने त्यांना नकार दिला, कारण त्या कथांमध्ये नाविन्य नव्हते. ती म्हणाली, "मला गेल्या पाच वर्षांपासून पंजाबी चित्रपटांच्या ऑफर येत आहेत, पण मी त्या करत नव्हते. मी कोणाचीतरी अशी अपेक्षा करत होते की त्यांनी एका वेगळ्या संकल्पनेसह माझ्यावर विश्वास ठेवावा. मला पंजाब इंडस्ट्रीत एका वेगळ्या अंदाजात पुनरागमन करायचे होते, खासकरून ३-४ वर्षांनंतर परत आल्यावर, मी याच गोष्टीची वाट पाहत होते."
"मी आधी स्वतःला सिद्ध करू इच्छिते"
शहनाजने पुढे सांगितले की, "स्क्रिप्ट आणि चित्रपट समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मला केवळ दिखाव्यासाठी काहीही करायचे नव्हते, कारण या गोष्टी कायमस्वरूपी राहतात. मी विचार केला, आपल्या पंजाबी इंडस्ट्रीतच काहीतरी वेगळं का करू नये जिथे आपण खरंच काहीतरी बदल घडवू शकू? आपण फक्त बॉलिवूडच्या मागे का धावत आहोत?' मी एक दिवस नक्कीच तिथे काम करेन, पण आधी मला स्वतःला सिद्ध करायचे आहे. मी बॉलिवूडसाठी ऑडिशन देत आहे, माझे सर्वोत्तम परफॉर्म करत आहे, पण आधी एक कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध करणे खूप महत्त्वाचे होते."