माझ्या आयुष्यात आलेल्या 'त्या' व्यक्तीचा मी द हिट गर्ल या पुस्तकात उल्लेख केला आहेः आशा पारेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 16:17 IST2017-04-08T12:03:58+5:302017-08-03T16:17:47+5:30

आशा पारेख यांनी आसमान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. दिल देके देखो ...

I have mentioned the person who came in my life in The Hit Girl: Asha Parekh | माझ्या आयुष्यात आलेल्या 'त्या' व्यक्तीचा मी द हिट गर्ल या पुस्तकात उल्लेख केला आहेः आशा पारेख

माझ्या आयुष्यात आलेल्या 'त्या' व्यक्तीचा मी द हिट गर्ल या पुस्तकात उल्लेख केला आहेः आशा पारेख

ा पारेख यांनी आसमान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. दिल देके देखो या चित्रपटात त्या पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत झळकल्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आशा पारेख यांनी पहिल्या चित्रपटापासून त्यांच्या दर्जेदार भूमिकांतून त्यांचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांनी कमीतकमी 30-35 वर्षं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या आयुष्यावर आधारित द हिट गर्ल हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

स्वतःचे आयुष्य पुस्काच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचावे असा विचार तुम्ही कसा केला?
खरे तर पुस्तक लिहिण्याबद्दल कधी मी विचारच केला नव्हता. पण खालिद मोहोब्बद यांनी मला पुस्तकाबद्दल विचारल्यावर मी याबाबत थोडा विचार केला आणि त्यांना या पुस्तकासाठी होकार दिला. माझ्या जन्मापासून ते आजवरपर्यंतचा प्रवास या पुस्तकात लोकांना वाचायला मिळणार आहे.
अनेक सेलिब्रेटी आपले खाजगी आयुष्य लोकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या या पुस्तकात तुम्ही तुमच्या नातेसंबंधांविषयी काही लिहिले आहे का?
मी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या नातेसंबंधांविषयीदेखील सगळ्याच खऱ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. केवळ मी पुस्तकात काही लोकांची नावे लिहिणे टाळली आहेत. नावांचा उल्लेख न करताच माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीविषयी मी लिहिले आहे.
तुम्ही नव्वदीच्या दशकापर्यंत चित्रपटात काम करत होता, त्यानंतर तुम्ही अभिनयक्षेत्राकडे पाठ फिरवली, याचे कारण काय?
मला केवळ आईच्या भूमिका ऑफर होत होत्या आणि मला त्या भूमिका करायचा कंटाळा आला होता. त्यामुळे मी अभिनय करायचा नाहीच असे ठरवले. आज अमिताभ बच्चन यांच्यासाठी अनेक भूमिका लिहिल्या जात आहेत, तशाच भूमिका माझ्यासाठी लिहिल्या गेल्या तर मला अभिनयक्षेत्रात परत यायला नक्कीच आवडेल.
तुम्ही अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळला होता, पण आज तुम्ही मालिकांचे दिग्दर्शन अथवा निर्मितीदेखील करत नाही आहात, असे का?
दिग्दर्शन करण्याची मला आवड होती. त्यामुळे मी एका गुजराती मालिकेचे दिग्दर्शन केले. ती मालिका प्रचंड गाजली आणि त्यानंतर मी कोरा कागज या हिंदी मालिकेचे दिग्दर्शन केले. या मालिकेलादेखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. पण त्यानंतर डेली सोपचे फॅड आले. डेली सोपमुळे तुम्हाला क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळत नाही. तसेच वाहिनींच्या मंडळींचा हस्तक्षेप खूप असतो. या सगळ्या कारणांमुळे मी मालिकांपासून दूर राहिली. मी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा विचार केला होता. महेश भट्ट यांचा तो चित्रपट होता. त्या चित्रपटाच्या कथेवर मी सहा महिने काम केले. पण काही गोष्टीत मतभेद होत असल्याने मी तो चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. तो चित्रपट नंतर अरुणा राजे यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपचा नाव भैरवी असे होते. 
आज तुमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर आयुष्यातील सगळ्यात चांगला क्षण कोणता होता असे तुम्हाला वाटते?
दिल देके देखो हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर मला झालेला आनंद मी आजही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला या चित्रपटाच्याआधी अनेक निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. पण या चित्रपटाने मला एका रात्रीत स्टार बनवले.
हेलन, वहिदा रहेमान यांसारख्या तुमच्या काळातल्या अभिनेत्री आजही तुमच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. तुमच्या या मैत्रीबद्दल काय सांगाल?
चित्रपटात काम करत असताना मित्रमैत्रिणींसोबत फिरायला मला वेळच मिळत नसे. सकाळी साडे नऊ वाजता माझे चित्रीकरण सुरू होत असे ते रात्री साडे सहापर्यंत आणि त्याच्यानंतर रात्री सात वाजता नृत्याचा कार्यक्रम असे. सुट्टीच्या दिवशी मी आराम करत असे अथवा नृत्याची तालीम करत असे. पण आता गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आम्ही सगळ्याजणी एकत्र भेटतो, फिरायला जातो, चित्रपट पाहातो, चित्रपटांवर गप्पा मारतो. 
तुम्ही बालकलाकार म्हणून तुमच्या करियरला सुरुवात केली. तुम्ही कोणत्याच प्रकारचा अभिनय शिकलेला नाही. अभिनय शिकण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
आज अनेक इन्स्टिट्युट आल्या आहेत. आमच्यावेळी तसे काहीही नव्हते. आम्ही सेटवर शिकायचो. अभिनयाची तुम्हाला आवड असणे गरजेचे असते आणि त्यातही अभिनय ही उपजत कलाच अनेकांमध्ये असते असे मला वाटते. 
आजच्या आणि तुमच्या काळातील इंडस्ट्रीत काय फरक आहे असे तुम्हाला वाटते?
आम्ही काम केले त्यावेळेचा काळ आणि आजचा काळ संपूर्णपणे वेगळा आहे. तांत्रिकदृष्ट्या आज प्रचंड प्रगती झाली आहे आणि ती खूपच चांगली गोष्ट आहे. आमच्यावेळात लाइट, कॅमेरे अगदी साधे असायचे. आम्ही सेटवर गेल्यानंतर आजचे दृश्य काय आहे हे आम्हाला सांगितले जायचे आणि त्यानंतर आम्ही संवाद पाठ करायचो आणि चित्रीकरण व्हायचे. आजच्या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे आजच्या काळात मी असते तर मी नक्कीच अभिनेत्री बनले नसते. 
तुम्ही अनेक कलाकारांसोबत काम केले आहे, तुमचा सगळ्यात आवडता सहकलाकार कोण?
शम्मी कपूर यांच्यासोबत मी दिल देके देखो या माझ्या पहिल्या चित्रपटात काम केले होते. त्यामुळे त्यांची आणि माझी केमिस्ट्री छान जुळून आली होती. आजही मी त्यांना खूप मिस करते.
तुम्ही एक चांगल्या डान्सर आहात, आजच्या काळातील कोणती अभिनेत्री एक चांगली डान्सर असल्याचे तुम्हाला वाटते?
मी नृत्य शिकले होते. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचे नृत्य सहज करू शकत असे. आजच्या काळात मला कतरिना कैफ ही खूप चांगली डान्सर असल्याचे वाटते. तिनेदेखील नृत्याचे शिक्षण घेतले असून ती त्यावर खूप मेहनत घेते.
तुमच्या नावाने आज एक रुग्णालय आहे, रुग्णालय सुरू करण्याचा विचार कसा केला?
मी डॉक्टर बनावे अशी माझ्या आईची नेहमी इच्छा होती. पण मी अभिनयाकडे वळली. माझी आई एका रुग्णालयाशी संबंधित होती. त्यामुळे त्या रुग्णालयात एक वॉर्ड आम्ही डोनेट केला. तिथे केवळ गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचा उपचार केला जातो. काही काळानंतर माझ्या लोकप्रियतेमुळे त्या रुग्णालयाला लोक माझ्या नावानेच ओळखू लागले. आज मी त्या रुग्णालयाची ट्रस्टी आहे. मी अनेकवेळा तिथे जाते. तिथल्या रुग्णांना भेटते. 
आज तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता?
मी फिल्म इंडस्ट्री वेल्फेअर सोसायटी आणि माझ्या रुग्णालयाच्या कामात प्रचंड व्यग्र असते. तसेच घरचे काम असते. या सगळ्यात वेळ कधी जातो हेच मला कळत नाही. 

Web Title: I have mentioned the person who came in my life in The Hit Girl: Asha Parekh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.