मी हिट -फ्लाॅपच्या समीकरणात पडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 15:39 IST2016-10-18T15:31:10+5:302016-10-18T15:39:34+5:30

दोन राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार पटकावत आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणार अभिनेता अशी मनोज वाजपेयीची ओळख. ‘सत्या’मधला भिकू ...

I do not fall into the equation of hit-flop | मी हिट -फ्लाॅपच्या समीकरणात पडत नाही

मी हिट -फ्लाॅपच्या समीकरणात पडत नाही

id=":4d">
दोन राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार पटकावत आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणार अभिनेता अशी मनोज वाजपेयीची ओळख. ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे असो किंवा मग नुकतच काही दिवसांपूर्वी झळकलेला ‘अलीगढ’ सिनेमातील प्राध्यापक असो. प्रत्येक भूमिकेत आपल्या संवेदनशील आणि दमदार अभिनयाने जीव ओतणारा अवलिया म्हणजे मनोज वाजपेयी. ‘सात उचक्के’ या सिनेमाच्या निमित्ताने मनोज वाजपेयीशी सीएनएक्स लोकमतने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

 

‘सात उचक्के’ या शीर्षकावरुनच सिनेमा काहीसा वेगळा वाटतोय. या सिनेमाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ?

माझ्या जीवनात मी आजवर विविध सिनेमांमध्ये काम केलंय. प्रत्येक सिनेमाचं एक वेगळेपण होते. मात्र माझ्या आजवरच्या जीवनातला हा वेगळा सिनेमा आहे. खूप कमी कलाकार असतात की ज्यांना आपल्या आवडत्या आणि मनासारख्या भूमिका साकारण्याची संधी मिळते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला माझ्या आवडीची भूमिका करण्याची संधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली. या सिनेमात रसिकांना जुनी दिल्ली पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रसिकांना जुन्या दिल्लीला एकदा तरी भेट द्यावी असं वाटेल. जुन्या दिल्लीतले लोक वेगळे आहेत. त्यांची संस्कृती वेगळी आहे. स्वभाव, खाणं-पिणं, बोलणं-चालणं सारं काही वेगळे आहे. त्यांचा हाच वेगळा अंदाज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

 
एखादा सिनेमा साईन करण्याआधी तु कोणत्या गोष्टीचा विचार करतोस. त्या सिनेमाची बॉक्स ऑफिस वॅल्यू की सिनेमाची कथा ?

सुरुवातीपासूनच मी ठरवलंय की जे मनाला पटेल, जे मनाला भावेल तेच करायचे आणि आजवर मी तेच करत आलोय. आजवर बॉक्स ऑफिस वॅल्यू लक्षात घेऊन कोणत्याही सिनेमात काम केलेलं नाही. सिनेमाची कथा चांगली होती, काम चांगलं होतं मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमाला यश मिळालं नाही तर तुम्ही कितीही चांगलं काम केलं याला महत्त्व नसतं. खोटं सांगत नाही सिनेमा चालला नाही तर तुम्ही कितीही चांगलं काम करा सारं व्यर्थ असतं असे मला वाटते.

 
तुझे आणि दिल्लीचं एक वेगळ नातं आहे.या सिनेमाच्या निमित्ताने काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या ?

दिल्लीत माझा जन्म झाला नाही, इथे वाढलो नाही तरीही दिल्लीशी एक वेगळं नातं आहे. कारण इथं मी काही वर्ष थिएटर केले आहे. आता माझं कुटुंब दिल्लीत राहतं. मात्र ज्यावेळी मी दिल्लीत आलो त्यावेळची दिल्ली खूप वेगळी होती. वयाच्या 17 व्या वर्षी दिल्लीत आलो त्यावेळी जे जे मी अनुभवले, जी दिल्ली पाहिली ती या सिनेमात आपल्या अभिनयाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 
या सिनेमात शिव्या आणि द्वैअर्थी शब्दप्रयोग आहेत. त्यामुळं सेन्सॉरमध्ये सिनेमा अडकला होता. तर सेन्सॉरविषयी तुझे काय म्हणणं आहे ?

सिनेमांवर सरसकट बंदी हे अयोग्य आहे असे वाटते. सिनेमात सेन्सॉरने कट सुचवावे कि मग थेट बंदी घालावी. नक्की काय करायचं याची एक प्रक्रिया असावी, त्यावर चर्चा आणि विचार व्हावा असे वाटते.

 
या सिनेमात तू के.के. मेननसोबत काम केले आहे असं बोललं जातंय की तुमच्या दोघांमध्ये काही स्पर्धा होती, तणाव आहे तर यांत कितपत तथ्य आहे ?

या चर्चांमध्ये बिल्कुल तथ्य नाही. के. के. मेननसारख्या कलाकारांसोबत काम करणे, विविध विषयांवर एकमेंकांची मतं विचारात घेणे खरंच चांगलं वाटलं. के.के. मेनन एक हुशार, सगळ्या गोष्टींची जाण असलेला, अनुभवी कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करताना नवनवीन गोष्टी शिकता आल्या. कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेची किंवा ईर्षेची भावना नव्हती.

 

Web Title: I do not fall into the equation of hit-flop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.