हुमा कुरेशीची बॉलिवूड कलाकारांवर नाराजी, म्हणाली- "इथल्या लोकांना व्यवस्थित हिंदी बोलता येत नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:36 IST2025-11-18T13:35:39+5:302025-11-18T13:36:48+5:30
बॉलिवूडमधील कलाकारांवर हुमा कुरेशीने नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय हुमाने गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. काय म्हणाली?

हुमा कुरेशीची बॉलिवूड कलाकारांवर नाराजी, म्हणाली- "इथल्या लोकांना व्यवस्थित हिंदी बोलता येत नाही..."
अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) सध्या तिच्या 'महाराणी' आणि 'दिल्ली क्राईम ३' या बहुचर्चित वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आहे. 'महाराणी' या सीरिजमधील दमदार अभिनयासाठी हुमाने बिहारी भाषा शिकण्यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेमांमध्ये जी हिंदी भाषा वापरली जाते, त्यावरुन गंभीर टीका केली आहे. हुमा कुरेशीचे मत आहे की, हिंदी चित्रपट इंडस्ट्रीशी जोडलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांना धड हिंदी बोलता येत नाही.
हुमा कुरेशी काय म्हणाली?
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हुमा कुरेशीने बॉलिवूडमधील कामाच्या पद्धतीवर टिप्पणी केली. ती म्हणाली, "हिंदी चित्रपट इंडस्ट्री असूनही, येथील अर्ध्याहून अधिक लोकांना व्यवस्थित हिंदी बोलता येत नाही." तिने पुढे सांगितले की, सेटवर होणारे संवादही इंग्रजीत असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सही इंग्रजी भाषेतच छापल्या जातात.
यावर प्रश्न उपस्थित करत हुमा म्हणाली, "तुम्ही चित्रपट कोणासाठी बनवत आहात? तुम्ही हे चित्रपट हिंदी बोलणाऱ्या प्रेक्षकांसाठी बनवत आहात. मग कमीत कमी हिंदी तरी बोला!"
'महाराणी'साठी केली होती खास तयारी
हुमा कुरैशीने वेबसीरिजच्या दुनियेतही आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. तिच्या 'महाराणी' या सिरीजमधील भूमिकेसाठी तिने बिहारी भाषेवर विशेष मेहनत घेतली होती. तर 'दिल्ली क्राईम ३' मधील खलनायिका साकारण्यासाठी तिने हरयाणवी बोली शिकण्यासाठी मेहनत घेतली. एका जुन्या मुलाखतीत हुमाने सांगितले होते की, "जर मी एखाद्या व्यक्तीसोबत रोज अर्धा - एक तास घालवला, तर मी त्यांच्यासारखे बोलायला सुरुवात करू शकते," असे ती म्हणाली होती.