शाहरुख खान नवीन घराचं 'इतकं' भाडं देतोय दर महिन्याला, तेवढ्या पैशात तुम्ही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:16 IST2025-06-12T12:15:53+5:302025-06-12T12:16:51+5:30
शाहरुख सध्या राहतोय भाड्याच्या घरात; महिन्याचं भाडं किती माहितीये?

शाहरुख खान नवीन घराचं 'इतकं' भाडं देतोय दर महिन्याला, तेवढ्या पैशात तुम्ही...
शाहरुख खान गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवुडवर राज्य करतोय. शाहरुखचा मन्नत हा बंगला तर देशभरात चर्चेचा विषय ठरतो. या घरापुढे फक्त एक फोटो काढण्यासाठी शेकडो लोक रोज मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करतात. काही दिवसांपुर्वीच शाहरुख खान याने मन्नतमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्यानं संपुर्ण कुटुंबासह त्याचा हाच बंगला सोडलाय. आपली पत्नी आणि मुलांसह चार मजली रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतोय. पण या घरासाठी तो जे भाडं देतोय, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शाहरुख सध्या 'पूजा कासा' या प्रॉपर्टीत राहत असून, ती सुप्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांची मालमत्ता आहे. या प्रॉपर्टीसाठी शाहरुखने तीन वर्षांचा करार केला असून एकूण ८.६७ कोटी रुपये भाडं देत आहे. यामुळे त्याचे मासिक भाडे सुमारे २४ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
शाहरुखनं स्टाफसाठी खारच्या पंकज सोसायटीत एक फ्लॅट देखील भाड्याने घेतला आहे. हे शाहरुखच्या नवीन जागेपासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे. हा फ्लॅट संजय किशोर रमाणी यांचा आहे. या फ्लॅटसाठी दरमहा १.३५ लाख रुपये भाडं दिलं जात आहे. तर ४.०५ लाखांची सुरक्षा ठेव देखील देण्यात आली आहे. हा करारही तीन वर्षांसाठी आहे आणि दरवर्षी भाडं ५ टक्क्याने वाढणार आहे.
शाहरुखची पत्नी गौरी खान यांनी अलीकडेच News18 शी संवाद साधताना सांगितलं की, मन्नतचं पुनर्बांधणीचं काम सुरू असून, २०२६ पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या शाहरुख संपूर्ण कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत आहे.