'हेरा फेरी ३'चा टीझर IPL 2025 दरम्यान येणार? सुनील शेट्टीने दिलं अपडेट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:01 IST2025-05-06T11:00:49+5:302025-05-06T11:01:20+5:30
'हेरा फेरी ३'बाबत सुनील शेट्टीची मोठी घोषणा, चाहते खूश!

'हेरा फेरी ३'चा टीझर IPL 2025 दरम्यान येणार? सुनील शेट्टीने दिलं अपडेट, म्हणाला...
Hera Pheri 3 Teaser Ipl 2025: बॉलिवूडमध्ये काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'हेरा फेरी' फ्रँचायझी. हे फक्त एक कॉमेडी चित्रपट नाहीत, तर कल्ट क्लासिक आहेत. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाच्या अफलातून कॉमिक टायमिंगने सजलेल्या 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक 'हेरा फेरी ३'ची उत्सुकतेने वाट पाहत होते. आता अभिनेता सुनील शेट्टीने या चित्रपटाविषयी मोठी माहिती दिली आहे. हे अपडेट जाणून घेतल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
सध्या सुनील शेट्टी हा 'केसरी वीर' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं 'हेरा फेरी ३'च्या टीझरबाबत एक दिलासादायक अपडेट दिलं आहे. तो म्हणाला, "आम्ही शुटिंगला सुरुवात केली असून टीझर देखील शूट केला आहे. आयपीएलदरम्यान हा टीझर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे". पुढे तो म्हणाला, "मी खूप उत्साहित आहे, कारण टीम तीच आहे. हा चित्रपट नेहमीच इतर चित्रपटांपेक्षा वेगळा राहिला आहे", या शब्दात त्यानं आनंद व्यक्त केला.
याच मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने सेटवरील वातावरणाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "जेव्हा आम्ही तिघे एकत्र येतो, तेव्हा सेटवर जणू काही धमाल सुरूच असते. खरं तर, तिथे एक वॉर्निंग बोर्ड लावायला हवा. कारण आम्ही तिघे सोबत असलो की वातावरणच बदलून जातं. प्रियदर्शन सर नेहमी म्हणतात, जर मस्ती करायची असेल, तर शुटिंगनंतर करा".
'हेरा फेरी ३'चं दिग्दर्शन पुन्हा एकदा प्रियदर्शन करत आहेत. २००० मध्ये त्यांनीच पहिला 'हेरा फेरी' चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यामुळे 'ओरिजिनल टच'सह हे त्रिकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालं आहे.गेल्या काही वर्षांपासून या चित्रपटासंबंधी विविध चर्चा सुरू होत्या. मात्र आता कलाकार आणि दिग्दर्शक एकत्र काम करत असल्याने चित्रपटाच्या शूटिंगला वेग आला आहे. चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरीही टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये 'हेरा फेरी ३'ची उत्सुकता आणखी वाढली आहे.