सनी-बॉबीसोबत पटत नाही? हेमा मालिनींनी अखेर चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाल्या, "आजही आमचं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:17 IST2026-01-13T14:17:29+5:302026-01-13T14:17:59+5:30
धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' अजूनही पाहिला नाही...

सनी-बॉबीसोबत पटत नाही? हेमा मालिनींनी अखेर चर्चांवर दिलं उत्तर; म्हणाल्या, "आजही आमचं..."
अभिनेते धर्मेंद्र यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली. त्यांचं निधन संपूर्ण देशाला चटका लावून गेलं. यानंतर सनी-बॉबी यांनी शोकसभा ठेवली होती. तर हेमा मालिनी यांनी घरी स्वतंत्र प्रार्थनासभा ठेवली. यावरुन अनेक चर्चा झाल्या. हेमा मालिनी यांचं सनी-बॉबीशी पटत नाही असं पुन्हा बोललं जाऊ लागलं. आता यावर हेमा मालिनींनी प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, "सनी आणि बॉबी दोघांसोबतही माझं कायम प्रेमळ नातं राहिलं आहे. आजही ते तसंच आहे. आमच्यात काहीतरी गडबड आहे असं लोकांना का वाटतं हे मला कळत नाही. लोकांना फक्त गॉसिप करायचं असतं. मी कशाला त्यांना उत्तरं देऊ? मला त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हे आमचं वैयक्तिक आयुष्य आहे. आम्ही सगळेच आनंदी आहोत आणि एकमेकांच्या खूप जवळ आहोत. सनी आपल्या वडिलांच्या आठवणीत एक संग्रहालय उभारण्याचीही योजना आखत आहे. सनी जे काही करेल तो मला येऊन सांगेल याची मला खात्री आहे. आम्ही सगळे मिळून हा निर्णय घेऊन आणि ते काम पूर्ण करु.ठ
हेमा मालिनींनी अजूनही पाहिला नाही 'इक्कीस'
हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' अजूनही पाहिलेला नाही. त्या म्हणाल्या, "इक्कीस रिलीज झाला तेव्हा मी मथुरेत होते. मला तिथे काम करायचं होतं. तसंही मी सध्या सिनेमा बघू शकणार नाही. माझ्यासाठी हे खूप भावनिक असणार आहे. माझ्या मुलीही मला हेच सांगत आहेत. कदाचित थोडा काळ गेल्यानंतर मी हा सिनेमा बघेन."