हंसिका मोटवानीचा संसार ४ वर्षांतच का मोडला? मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:12 IST2026-03-13T17:10:19+5:302026-03-13T17:12:06+5:30
हंसिका आणि सोहेल हे गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते.

हंसिका मोटवानीचा संसार ४ वर्षांतच का मोडला? मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत केलेलं लग्न
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि व्यावसायिक सोहेल कथुरिया यांच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या शाही विवाहानंतर अवघ्या तीन वर्षांतच या जोडप्याने अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. पण, त्यांनी घटस्फोट का घेतला, याबद्दल माहिती समोर आली आहे.
हंसिका आणि सोहेल हे गेल्या २ जुलै २०२४ पासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांच्यात वारंवार होणारे मतभेद आणि जीवनशैलीतील तफावत यामुळे हे नाते पुढे नेणे अशक्य असल्याचे दोन्ही पक्षांनी न्यायालयात मान्य केले. विशेष म्हणजे, हंसिकाने सोहेलकडे कोणत्याही प्रकारची पोटगी किंवा देखभालीच्या खर्चाची मागणी केलेली नाही. केवळ शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात हे लग्न संपवणे, हाच तिचा उद्देश होता.
हंसिकाचे वकील अदनान शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसिका आणि सोहेलमध्ये अनेकदा किरकोळ कारणांवरून भांडणे होत असत. त्यांचे पालक आणि मित्रपरिवाराने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. अखेर दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हंसिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नाचे फोटो आधीच डिलीट केले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती.
हंसिका आणि सोहेल हे गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये सोहेलने पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर हंसिकाला रोमँटिक अंदाजात मागणी घातली होती. त्यानंतर ४ डिसेंबर २०२२ रोजी जयपूरमध्ये त्यांचा विवाह पार पडला. मात्र, हे लग्न सुरुवातीपासूनच वादात राहिले होते.
सोहेलचे हे दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न हंसिकाची मैत्रीण रिंकी बजाजशी झाले होते. मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केल्यावरुन हंसिकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.घटस्फोटाच्या या कायदेशीर प्रक्रियेनंतर हंसिका आता तिच्या व्यावसायिक आयुष्यावर आणि आगामी प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणार आहे. तिच्या वकिलांनी स्पष्ट केले की, ती आता आपल्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छित असून तिचे सर्व लक्ष कामावर आहे.