अमिताभ बच्चन आणि आयुषमानची मजेदार तू तू मैं मैं...! ‘गुलाबो सिताबो’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 17:24 IST2020-05-22T17:23:34+5:302020-05-22T17:24:51+5:30
येत्या 12 जूनला ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा शानदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली नसेल तर नवल.

अमिताभ बच्चन आणि आयुषमानची मजेदार तू तू मैं मैं...! ‘गुलाबो सिताबो’च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा आता चित्रपटगृहांत नाही तर ओटीटीवर रिलीज होणार आहे. येत्या 12 जूनला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा शानदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली नसेल तर नवल.
शुजित सरकार दिग्दर्शित या सिनेमाची स्टोरी काय तर घरमालक आणि भाडेकरूची कथा. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य काय तर अमिताभ यांचा लूक. होय, अमिताभ या सिनेमात कधी नव्हे अशा एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये त्यांची झलक पाहताना एक वेगळी मजा येते.
ट्रेलरमधील आयुष्मान आणि अमिताभ यांच्यातील ‘तु मैं मैं’ पाहताना मजा येते. या ट्रेलरच्या सुरूवातीला लखनऊमधील एका जुन्या हवेलीचा मालक असणारा मिर्झा (अमिताभ बच्चन) त्याचा भाडेकरू बंकी (आयुष्मान खुराना)च्या खोलीतून बल्ब चोरी करताना दिसतो. बंकी मिर्झाच्या हवेलीमध्ये गेली अनेक वर्ष भाडे न वाढवता राहत असतो. त्यामुळे मिर्झाला एकतर तो तिथे राहायला नको असतो. याकरता मिर्झा म्हणजेच अमिताभ बच्चन काय खटाटोप करतो आणि आयुष्मान त्याला कसा पुरून उरतो, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
अमिताभ बच्चन यांचा लखनवी अंदाज नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा ठरणार आहे. एका जर्जर झालेल्या हवेलीच्या मालकाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आणि भाडेकरूच्या रूपात आयुषमान यांना पहिल्यांदा एकत्र पाहणे कमालीचे इंटरेस्टिंग आहे.
सोशल मीडियावर तुफान हिट
‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर तो हिट झाला आहे. अगदी तासाभरात 3 लाखांवर लोकांनी तो पाहिला.
ओटीटी रिलीज
लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह बंद आहेत. अशात अनेक चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. ‘गुलाबो सिताबो’ नंतर विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हा सिनेमा देखील आॅनलाइन प्रदर्शित करण्यात येणार आहे.