घर चालवण्यासाठी या अभिनेत्यावर वेळ आली आहे सिक्युरीटी गार्ड बनण्याची
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 13:07 IST2019-03-19T13:00:25+5:302019-03-19T13:07:17+5:30
आज या अभिनेत्याला कोणतेही चित्रपट मिळत नसल्याने त्यांच्यावर सिक्युरीटी गार्डचे काम करण्याची वेळ आली आहे.

घर चालवण्यासाठी या अभिनेत्यावर वेळ आली आहे सिक्युरीटी गार्ड बनण्याची
बॉलिवूडमध्ये मिळालेले यश टिकवणे हे खूपच कठीण असते. अभिनेता सवी सिद्धू यांनी पटियाला हाऊस, बेवकूफियाँ, गुलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती देखील मिळाली आहे. पण आज त्यांना कोणतेही चित्रपट मिळत नसल्याने त्यांच्यावर सिक्युरीटी गार्डचे काम करण्याची वेळ आली आहे.
सवी सिद्धू यांची कथा फिल्म कम्पेनियन या युट्युब चॅनलवरील व्हिडिओवर ऐकायला मिळत आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये ते त्याच्या सध्याच्या जीवनाविषयी, त्याच्यावर सिक्युरीटी गार्ड बनण्याची वेळ का आली तसेच त्याच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी सांगत आहेत. ते सांगतात, मी स्ट्रगल करत असताना अनुराग कश्यप यांच्यासोबत माझी ओळख झाली आणि मला पांच या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट त्यांचा देखील पहिलाच चित्रपट होता. काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर त्यांनी मला ब्लॅक फ्रायडे या चित्रपटात घेतले. या चित्रपटात मी कमिशनर समरा ही भूमिका साकारली होती. त्यानंतर मी गुलाल या चित्रपटात काम केले. निखिल आडवाणी यांच्या पटियाला हाऊसमध्ये देखील मला खूप चांगली भूमिका साकारायला मिळाली.
सवी यांनी त्यांचे शालेय शिक्षण लखनऊमध्ये पूर्ण केले आहे. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी चंडिगडमध्ये काही वर्षं राहिले. तिथे त्यांना मॉडलिंगच्या ऑफर मिळाल्या. त्यानंतर लॉ चे शिक्षण घेण्यासाठी ते पुन्हा लखनऊमध्ये आले. त्याचवेळात त्यांनी रंगमंचावर काम करायला सुरुवात केली. ते सांगतात, लहानपणापासून माझ्यात अॅक्टिंगचा किडा होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. माझ्या भावला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाल्याने माझ्यासाठी मुंबईला येणे अतिशय सोपे झाले. त्यानंतर मी मुंबईत येऊन निर्मात्यांना भेटायला सुरुवात केली. तिथून माझ्या स्ट्रगला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
बॉलिवूडमध्ये मिळालेल्या अपयशाविषयी ते सांगतात, मला कधीच काम मिळाले नाही असे झाले नाही. याउलट माझ्याकडे जास्त काम असल्याने मी काही चित्रपटांना नकार देत होतो. पण माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी शक्य होत नव्हते. याच कारणाने काही काळानंतर मला काम मिळणे बंद झाले आणि त्यामुळे पैशांची चणचण निर्माण झाली. त्यात माझ्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर माझ्या आई वडिलांचे, सासू सासऱ्यांचे देखील निधन झाले आणि मी एकटा पडलो.
सवी सिद्धू सध्याच्या त्याच्या स्थितीविषयी सांगतात, मी सध्या दिवसातील १२ तास एका हाऊसिंग सोसायटीमध्ये सिक्युरीटी गार्डचे काम करत आहे. कोणत्या निर्माता अथवा दिग्दर्शकाला भेटायला जायचे तर साधे बसचे देखील पैसे माझ्याकडे नाहीयेत. चित्रपट पाहाणे तर माझ्यासाठी स्वप्नच उरले आहे. चित्रपटांना मी खूप मिस करतोय, चित्रपट पाहावेत असे मला वाटते. पण माझी आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. पण मी आजही आशा सोडली नाहीये. मी परत येईन असेच मी म्हणेन.