"त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!"; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 10:43 IST2025-04-28T10:42:41+5:302025-04-28T10:43:13+5:30
अभिनेता इमरान हाश्मीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय दहशतवाद्यांना धडा शिकवायचा असेल तर काय केलं पाहिजे, याविषयीही बेधडक वक्तव्य केलंय. काय म्हणाला इमरान? जाणून घ्या (emraan hashmi)

"त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!"; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य
अभिनेता इमरान हाश्मी (emran hashmi) सध्या त्याच्या 'ग्राऊंड झिरो' (ground zero) सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. इमरानचा हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमात इमरानने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. इमरानचा सिनेमा रिलीज होण्याआधी पहलगाम हल्ला झाला. या हल्ल्यामुळे भारतातील तमाम नागरीकांना चांगलाच धक्का बसला. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत इमरानने पहलगाम हल्ल्याविषयी भाष्य केलंय. "दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे", असं इमरान म्हणाला
इमरानने विशाल मल्होत्राला दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं. इमरान म्हणाला की, "भारताची सुरक्षा यंत्रणा आणि त्याविषयी जी जाणकार मंडळी आहेत त्यांना याविषयी सविस्तर माहिती असेल. कारण आपली यंत्रणा खूप चांगली आहे. पहलगामच्या त्या भागात सुरक्षा असायला हवी होती, असाही एक प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु ते गवताचं मोठं मैदान आहे. त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही किती जवान तैनात करणार. ते ठिकाण पर्यटनाचं प्रमुख केंद्र होतं. "
"दहशतवाद्यांनी एक व्यवस्थित योजना आखून हा हमला केला. त्या ठिकाणी आजूबाजूला कोणताही रस्ता नव्हता. चांगल्या पद्धतीने प्लान करुन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ते तिथून पळाले. हा अत्यंत भ्याड हल्ला होता. लवकरात लवकर आपल्याला या धक्क्यातून सावरायचं आणि त्या माणसांना सडेतोड उत्तर द्यायचं आहे."
"जर त्यांनी आपली १० माणसं मारली तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजे, हीच युद्धाची रणनीती असते. जोवर आपण असं करणार नाही तोवर दहशतवाद्यांना धडा मिळणार नाही", अशाप्रकारे इमरानने त्याच्या भावना शेअर केल्या. इमरानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'ग्राऊंड झिरो' सिनेमाला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळत असून या सिनेमात इमरानसोबत सई ताम्हणकर, ललित प्रभाकर हे मराठी कलाकारही झळकत आहेत.