गोविंदाला फसवायचे निर्माते, नवऱ्यासाठी भिडलेली अभिनेत्याची पत्नी, म्हणाली- "कोणाला उल्लू बनवताय?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:29 IST2025-01-03T11:28:29+5:302025-01-03T11:29:54+5:30
सुनीता यांनी एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांकडून अनेकदा गोविंदाची फसवणूक झाल्याचा खुलासा केला.

गोविंदाला फसवायचे निर्माते, नवऱ्यासाठी भिडलेली अभिनेत्याची पत्नी, म्हणाली- "कोणाला उल्लू बनवताय?"
अभिनयाने ९०चं दशक गाजवणाऱ्या हरहुन्नरी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे गोविंदा. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून गोविंदाने त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. पण, बॉलिवूडच्या या यशस्वी कारकीर्दीत त्याच्या पत्नीची त्याला उत्तम साथ मिळाली. अनेकदा गोविंदाची निर्मात्यांकडून फसवणूक व्हायची. त्यामुळे त्याला त्याने केलेल्या कामाचे पैसेही मिळायचे नाहीत. पण, या सगळ्यातही गोविंदाची पत्नी सुनीता यांनी निर्मात्यांकडून अभिनेत्याला हे पैसे मिळवून दिले. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं.
सुनीता यांनी हॉटरफ्लाय या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्यांकडून अनेकदा गोविंदाची फसवणूक झाल्याचा खुलासा केला. त्या म्हणाल्या, "एक मॅनेजर म्हणून मी गोविंदाचं काम पाहायचे. लोक त्यांना पैसे द्यायचे नाहीत. आणि शो चालला नसेल असं बोलून गोविंदा हे सोडून द्यायचा. पण, मी त्याला विचारायचे की असं का? तू तर डान्स केलास ना? तू मेहनत केलीस. ते तुला उल्लू बनवत आहेत, हे मला कळत आहे".
गोविंदा खूप भावनिक असल्याने तो समोरच्यावर पटकन विश्वास ठेवायचा. आणि त्याच्या याच स्वभावाचा निर्माते फायदा घ्यायचे, असं सुनीता यांनी सांगितलं. "चीची भैय्या तिकीटे नाही विकली गेली. मी २०-२५ लाख रुपये तुम्हाला नंतर देईन, असं निर्माते म्हणायचे. पण, मला यावर विश्वास नव्हता. मी त्यांना म्हणायचे की तुम्ही कोणाला उल्लू बनवत आहात? मी तिथे उभी होते आणि पाहिलं की शो हाऊसफूल होता", असंही सुनीता म्हणाल्या.
सुनीता यांच्या या स्वभावामुळे सिनेइंडस्ट्रीमधील लोक त्यांना वाईट म्हणायचे. त्यांना चुकीचं समजत होते, असा खुलासाही त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, "त्यांनी मला श्राप दिला तरी काही फरक पडत नाही. मी त्यांच्यासमोर उभी राहून माझ्या हक्कांसाठी लढेन. गोविंदाला मी म्हणेन की तू तुझं काम कर, डान्स कर. बाकी सगळं मी बघते".